दुबईतील ICC अकादमीच्या मैदानात रंगलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने UAE चा धुव्वा उडवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकी खेळीसह एरॉन जार्ज आणि विहान मल्होत्राच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ४३३ धावा केल्या होत्या. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम युवा टीम इंडियाने आपल्या नावे केला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या UAE च्या संघाला भारताने १९९ धावांत ऑलआउट करत २३४ धावांनी सामना जिंकला.
आयुष म्हात्रे ठरला फ्लॉप! वैभव सूर्यवंशीसह या दोघांनी विश्वविक्रम रचण्यात उचलला मोलाचा वाटा
भारतीय संघाचे नेतृत्व करणारा आयुष म्हात्रे या सामन्यात फक्त ४ धावांवर माघारी फिरला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याने ९५ चेंडूत १७१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १४ षटकार मारले. त्याच्या धमाकेदार खेळीशिवाय एरॉन जार्ज आणि विहान मल्होत्राच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने ४०० पारचा आकडा गाठत आशिया कप स्पर्धेत विश्वविक्रमी धावसंख्या उभारली जार्जने ७३ चेंडूत ६९ धावा केल्या. याशिवाय विहान मल्होत्रा याने ५५ चेंडूत ६९ धावांची खेळी साकारली.
असा पराक्रम फक्त युवा टीम इंडियानेच करून दाखवलाय
आशिया कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारताना भारतीय संघाने अंडर १९ वनडेतील आपला रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. याआधी भारतीय संघाने दोन वेळा वनडेत ४०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत तिसऱ्यांदा युवा टीम इंडियाने ४०० पारचा डाव साधला. भारतीय संघाशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांनी प्रत्येकी एकदा ४०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली आहे. फक्त भारतीय संघाने तीन वेळा हा डाव साधला आहे.