Under 19 World Cup 2026 : भारतीय क्रिकेटच्या युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हरारेच्या मैदानावर पार पडलेल्या अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतानेइंग्लंडचा १०० धावांनी पराभूत करत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहर उमटवली. या ऐतिहासिक विजयाचा महानायक ठरला तो म्हणजे अवघ्या १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी. वैभवच्या १७५ धावांच्या तुफानी खेळीसमोर इंग्लंडचा संघ अक्षरशः पालापाचोळ्यासारखा उडून गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात संथ झाली होती, पण त्यानंतर मैदानात वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ आले. अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा कुटत वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याच्या या खेळीत १५ खणखणीत षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. त्याने केवळ ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ७१ चेंडूत १५० धावांचा टप्पा ओलांडला. वैभवच्या या आक्रमक खेळीमुळे भारताने ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा हिमालय उभा केला. कर्णधार आयुष म्हात्रेनेही ५३ धावांची संयमी खेळी करत त्याला मोलाची साथ दिली.
इंग्लंडचा प्रतिकार अपयशी
४१२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मायस (४५) यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. एका क्षणी इंग्लंडने अवघ्या ८ चेंडूंच्या अंतरात ४ महत्त्वाचे गडी गमावले आणि तिथूनच त्यांचा पराभव निश्चित झाला. कॅलेब फैलकॉनरने २६ चेंडूत अर्धशतक झळकावून थोडी धाकधूक वाढवली होती, पण अखेर इंग्लंडचा डाव ३११ धावांवर आटोपला.
टीम इंडियाचा 'रेकॉर्डब्रेक' प्रवास
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. हेनिल पटेलने भारतासाठी सर्वाधिक ११ बळी टिपले, तर वैभव सूर्यवंशी ४३९ धावांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता. आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-१९ क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.