Join us

U19 Asia Cup : भारतीय संघानं दिमाखात गाठली फायनल; सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा झाला 'गेम'

दाबात एन्ट्री मारणाऱ्या पाकिस्तान संघावर आली स्पर्धेतून आउट होण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:24 IST

Open in App

U19 Asia Cup Semi Final Result : अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अडखळत सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या बाजूला ज्या पाकिस्तान संघाने टीम इंडियाला पराभूत करत आशिया कप स्पर्धेत विजयी सलामी दिली होती त्यांचा मात्र सेमी फायनलमध्ये 'गेम' झालाय. शारजाहच्या मैदानात रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सेमी फायनल लढतीत भारतीय संघाने ७ विकेट्स राखून दमदार विजय नोंदवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानला दणका दिला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सन विजय मिळवत बांगलादेशचा संघही फायलमध्ये पोहचला आहे.  

भारतीय संघानं दिमाखात गाठली फायनल

मोहम्मद अमानच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर १९ संघानं आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फाननलमध्ये श्रीलंकेला शह देत फायनल गाठलीये. शारजाहच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं ४६.२ षटकात १७३ धावा केल्या होत्या.  हे अल्प टार्गेट भारतीय संघाने २१.४ षटकात ७ विकेट्स राखून सहज पार केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. आयुष म्हात्रेनं २८ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. वैभव सूर्यंवशी यानं कडक खेळी करत सलग दुसरी फिफ्टी झळकावली. त्याने ३६ चेंडूत ६७ धावांची दमदार खेळी केली. आंद्रे सिद्धार्थ याने २७ चेंडूत २२ धावा केल्या. आघाडीचे तीन फलंदाज सामना सेट करून माघारी फिरल्यावर कॅप्टन मोहम्मद अमान याने २६ धावांत नाबाद२५ धावांची खेळी केलीय. दुसऱ्या बाजुला केपी कार्थिकेयानं १४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिला. 

भारत-बांगलादेश यांच्यात रंगणार फायनल 

अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील दोन्ही सेमी फायनलच्या निकालानंतर यंदाच्या हंगामातील फायनलिस्ट ठरले आहेत. भारत आणि बांगलादेश या  दोन संघात ८ डिसेंबरला फायनल सामना खेळवला जाईल. ही लढत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आशिया कप स्पर्धेच्या फायनल लढतीला सुरुवात होईल. 

पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशनं मारली बाजी 

अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील 'अ' गटात पाकिस्तानच्या संघानं पहिला सामना हा भारतीय अंडर १९ संघाविरुद्ध खेळला होता. गटातील सर्वच्या सर्व ३ सामने जिंकून टॉप क्लास कामगिरीसह त्यांनी सेमी फायनल गाठली होती. दुसरीकडे बांगलादेशच्या संघानं 'ब' गटात ३ पैकी दोन सामन्यातील पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर राहून सेमीत एन्ट्री केली होती. या दोन्ही संघात पाकिस्तानचं पारडे जड होते. पण बांगलादेशच्या संघानं सेमीत पाकचा 'गेम' केला. बांगलादेशच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला ३७ षटकात ११६ धावांत आटोपले.  या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघानं २२.१ षटकात सामना खिशात घालत फायनल गाठली.

 

टॅग्स :एशिया कप 2023भारतभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाबांगलादेशपाकिस्तान