Smriti Mandhana Palash Muchhal's Wedding Postponed : विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छाल यांच्या लग्नात विघ्न आले आहे. घरातील मेडिकल इमर्जन्सी स्मृती-पलाश यांचे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी २३ नोव्हेंबरला दुपारी लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला होता. लग्न विधीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असताना अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्मृती मंधानाचे मॅनेजर तौहिन मिश्रा यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.
स्मृती मंधानाचे मॅनेजर तौहिन मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ब्रेकफ्रास्ट करत असताना स्मृती मंधाना यांचे वडील श्रीनिवास मंधांना यांची तब्येत बिघडली. थोडा वेळ वाट पाहिल्यावर आम्ही रुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्याच्या घडीला ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. स्मृतीचं वडिलांसोबतचे बॉन्डिंग एकदम खास आहे. त्यामुळेच वडिलांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय तिने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल जोडीनं २३ नोव्हेंबर रोजी आयुष्याची नवी भागीदारी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी जवळच्या मोजक्या मंडळींच्या साक्षीन सांगलीमध्ये विवाह समारंभ पार पडणार होता. सगळी तयारी झाली होती. पण आनंदाच्या क्षणी अचानक वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे एका क्षणात सगळं चित्रच बदलले.