Virat Kohli at MS Dhoni Party: झारखंडमधील रांची येथे झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या हाय-प्रोफाइल पार्टीला भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू उपस्थित असल्याचे दिसले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ आता रांचीमध्ये आहे. याचदरम्यान, रांची येथील एमएस धोनीच्या घरी भारतीय क्रिकेटपटू डिनर पार्टीसाठी भेटले. विराट कोहलीपासून ते ऋषभ पंतपर्यंत अनेक भारतीय खेळाडू धोनीच्या घरी झालेल्या या पार्टीला हजर होते.
टी२० आणि कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर, विराट केवळ वनडे संघातच दिसतो. भारताचा पहिला सामना ३० नोव्हेंबरला झारखंडच्या रांची येथील स्टेडियमवर आहे. त्यासाठी सर्व खेळाडू रांची येथे दाखल झाले आहेत. त्याचदरम्यान धोनीने खेळाडूंना आपल्या घरी डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी विराट कोहलीदेखील आला होता. विराट आपल्या आलिशान कारमधून धोनीच्या घरी दाखल झाला. विराट येणार याची चाहत्यांना कल्पना असल्याने ते गेटबाहेर त्याची एक झलक टिपण्यासाठी गर्दी करून उभे होते. विराटची कार जेव्हा गेटपाशी आली तेव्हा विराटने सर्वांना हसून अभिवादन केले आणि मग त्याची कार गेटमधून आत गेली. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
विराट कोहली सोबतच भारताचा युवा विकेटकिपर ऋषभ पंत यानेदेखील धोनीच्या डिनर पार्टीला हजेरी लावली. महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत या दोघांचे नाते खूपच घट्ट आहे. धोनीच्या आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पंतला विकेटकिपिंगचे धडे दिले. त्यामुळे पंत धोनीला गुरूस्थानी मानतो. अशा वेळी पंतदेखील धोनीच्या घरी डिनर पार्टीसाठी आल्याचे दिसला. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेही धोनीच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली. यासंबंधीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
---
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने ऋतुराजला वनडे संघात स्थान मिळाले. त्यामुळे तो देखील रांचीमध्ये दाखल झाला. त्यानंतर तोदेखील धोनीच्या घरी पोहोचला. या डिनर पार्टीसाठी टीम इंडियाचे आणखीही काही खेळाडू उपस्थित होते. त्यांना धोनीने दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.