आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारतीय संघाने दिलेल्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पिछाडीवर पडल्याने आता भारताच्या विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे. दरम्यान, या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर भारतीय संघाने विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन करत निर्धारित २० षटकांमध्ये २५५ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान, भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत तीन खास विक्रमांची नोंद केली.
आज अभिषेक शर्मा आणि तुफान फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन यांनी भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिली दोन षटके सावधपणे खेळून काढल्यानंतर दोघांनीही जोरदार हल्लाबोल करत भारतीय संघाला पॉवर प्लेमध्ये बिनबाद ९२ धावांपर्यंत मजल मारून दिली. टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पॉवर प्लेमध्ये एका संघाने फटकावेल्या ह्या सर्वाधिक धावा ठरल्या.
भारतीय संघाच्या आजच्या डावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि भारतीय संघानं रचलेला दुसरा विक्रम म्हणजे भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यात संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८९, अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२, ईशान किशनने २५ चेंडून ५४ धावा कुटत भारतीय संघाला दोनशेपार मजल मारून दिली. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एका संघातील पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती.
त्याबरोबरच भारतीय संघाने आज २० षटकात २५५ धावा ठोकल्या. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत एका डावात फटकावलेल्या ह्या सर्वाधिक धावा ठरल्या. तसेच टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात २५० हून धावा फटकावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.