Join us

IND vs SA ODI Series: 'गब्बर'ची निवड फक्त नावालाच? मुख्य सिलेक्टर चेतन शर्मांच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय...

रोहित शर्माच्या दुखापतीमुळे शिखर धवनला १८ सदस्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. पण अंतिम ११मध्ये त्याला संधी मिळेल का, याबद्दल निवड समिती प्रमुख चेतन शर्मांनी विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 20:09 IST

Open in App

Ruturaj Gaikwad vs Shikhar Dhawan: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिकादेखील खेळण्यात येणार आहे. या मालिकेसाठी काल १८ सदस्यांच्या संघाची घोषणा निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केली. नवा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाचे नेतृत्व राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. तर राहुलसोबत सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड, इशान किशन यांच्यासोबत अनुभवी शिखर धवन याला संघात स्थान मिळालं आहे. शिखर धवन तब्बल पाच महिन्यांनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. पण त्याला अंतिम ११ च्या संघात संधी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचं दिसतंय.

भारताकडे सलामीसाठी केएल राहुलसोबत तीन पर्याय आहेत. आफ्रिकेच्या पिचचा धवनला अनुभव आहे. पहिल्या कसोटीच्या वेळी अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर अशी चर्चा रंगलेली असताना रहाणेला अनुभवाच्या जोरावर संधी देण्यात आली. तसाच प्रकार धवनसोबत होईल अशी फॅन्सला अपेक्षा आहे. पण चेतन शर्मा यांनी काल संघ घोषित केल्यानंतर एक महत्त्वाचं विधान केलं. त्यामुळे धवनला संघात संधी मिळणं जरा कठीणंच असल्याचं दिसून येत आहे.

ऋतुराज गायकवाड हा दक्षिण आफ्रिकेतील वन डे मालिकेत चमत्कार करून दाखवेल असं विधान चेतन शर्मा यांनी केलं. "ऋतुराजला योग्य वेळी संधी देण्यात आली आहे. त्याला आधी टी२० संघात खेळवलं होतं, आता वन डे संघातही स्थान देण्यात आलंय. ऋतुराजसारख्या युवा खेळाडूंना शक्य तेथे संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण ऋतुराज जिथे क्रिकेट खेळेल तेथे तो संघासाठी चमत्कार घडवू शकेल आणि दमदार कामगिरी करू शकेल", असं विधान चेतन शर्मा यांनी केलं. ऋतुराजचं अंतिम ११ मधील स्थान जवळपास निश्चित आहे. दुसरा सलामीवीर हा खुद्द कर्णधार केएल राहुल आहे. अशा परिस्थितीत शिखर धवनची निवड ही केवळ नावापुरतीच आहे की काय, अशा चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगताना दिसत आहे.

"ऋतुराजला १८ सदस्यांच्या संघात आम्ही स्थान दिलं आहे. अंतिम ११ च्या संघात त्याला संधी द्यायची की नाही याचा निर्णय संघ व्यवस्थापन त्यावेळची परिस्थिती पाहून घेईल. संघात कॉम्बिनेशन कसं असावं यावर त्याची निवड ठरेल", असंही चेतन शर्मा म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघ
Open in App