भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आज लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी तणावमुक्त होण्यासाठी आणि रिलॅक्स करण्यासाठी थोडा वेळ काढला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण टीम इंडियाने लखनौमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेतला.
रणवीर सिंहचा 'धुरंधर' पाहिला लखनौच्या 'फीनिक्स पलासियो' मॉलमध्ये टीम इंडियासाठी रात्री १०:३० वाजताच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी अभिनेता रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट पाहिला. व्यस्त वेळापत्रक आणि सरावाच्या थकव्यामधून बाहेर पडण्यासाठी खेळाडूंनी हा 'मूव्ही ब्रेक' घेतल्याचे समजते.
मॉलमध्ये कडेकोट सुरक्षा भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मॉलमध्ये येणार असल्याने तेथे क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी लखनौ पोलिसांनी मॉल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता खेळाडूंनी चित्रपट पाहिला आणि त्यानंतर ते हॉटेलकडे रवाना झाले.
मालिकेतील चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या रिलॅक्स मूडनंतर आता भारतीय खेळाडू मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.