Join us

Team India सुरक्षित हातात आहे; प्रशिक्षक गंभीरचं कौतुक करताना दिग्गज ब्रेट लीचं विधान

गौतम गंभीर आता मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:51 IST

Open in App

gautam gambhir team india coach : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिकेटपटू, राजकारणी आणि मेंटॉर अशी कारकीर्द राहिलेल्या गौतम गंभीरची नवी इनिंग सुरू झाली आहे. गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपासून गंभीर या पदाचा कारभार सांभाळेल. येत्या २७ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे आणि ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. अलीकडेच भारतीय संघाने विश्वचषक जिंकून कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या त्रिकुटाला ट्वेंटी-२० मधून निरोप दिला. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय शिलेदारांना धडे देण्याची प्रमुख जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर असेल. गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त करताना त्याचे कौतुक केले.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीनेही गंभीरचे कौतुक करताना काही बाबींवर प्रकाश टाकला. गौतम गंभीरला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून गंभीरने दोनदा किताब जिंकला. गतवर्षी संघाला मार्गदर्शन करून ट्रॉफी जिंकली. संघाला एकत्र ठेवून यश मिळवणे हे त्याच्याकडून शिकायला हवे. तो एक उत्तम खेळाडू असून, त्याचा आक्रमकपणा सर्वांचे लक्ष वेधतो. म्हणूनच गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्याने संघाला खूप फायदा होईल यात शंका नाही. टीम इंडिया सुरक्षित हातात आहे. मी राहुल द्रविडचे कौतुक करू इच्छितो कारण त्याने संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोठे योगदान दिले, असे ब्रेट लीने सांगितले. तो 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होता. 

दरम्यान, २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. दोनही फायनलमध्ये गंभीरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने त्याआधीच बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. त्यात गौतम गंभीरचे नाव आघाडीवर होते. तसेच, भाजपाकडून २०१९ ते २०२४ या काळात खासदार असलेला गंभीर, यावेळची लोकसभा निवडणुक लढला नव्हता. कोलकाता संघाला मेंटॉर म्हणून IPL 2024 जिंकवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आज अखेर त्याच्या नावाच अधिकृत घोषणा झाली.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलिया