ब्रिस्बेन: भारताला विदेशात आणखी एक मालिका जिंकण्याची संधी शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळविण्याच्या रूपाने चालून येणार आहे. भारत सध्या २-१ ने आघाडीवर असून हा सामना जिंकल्यास १७ वर्षांत ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका न गमविण्याचा रेकॉर्डही कायम राहणार आहे.
शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे दिग्गज फलंदाजीतील उणिवा दूर करतील का, याकडे लक्ष असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियादेखील पुढच्या वर्षी भारत-लंकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टी-२० विश्वचषकाआधी भारतीय फिरकीचा भक्कमपणे सामना करताना दिसणार आहे.
मागच्या सामन्यात कठीण खेळपट्टीवर ताळमेळ साधून भारताने उत्कृष्ट रणनीतीसह सामना जिंकला. गिलने झकास सुरुवात करून दिल्याने भारताला १४ षटकांत २ बाद १२१ अशी वाटचाल करता आली होती. नंतर मात्र १५ धावांत आणखी ४ फलंदाज गमावले. उपकर्णधार असलेल्या गिलने ७ डावांत एकही अर्धशतक ठोकलेले नाही. चौथ्या सामन्यात ४६ धावा ठोकून मात्र त्याने संकेत दिले. सूर्याला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयश आले.
पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी कर्णधाराला मोकळेपणे फटकेबाजी करण्याचे उदाहरण सादर करावे लागेल. तिलक वर्मा या मालिकेत अपयशी ठरला. मागच्या तीन सामन्यांत तो शून्य, २९ आणि ५ धावांवर बाद झाला. यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मावरदेखील कामगिरीचे दडपण आहे. संजू सॅमसनच्या जागी संधी मिळूनही त्याने दोन सामन्यांत विशेष प्रभाव दाखविलेला नाही.
अभिषेक शर्मा टी-२०त अव्वलस्थानी आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकून आक्रमक सुरुवात करून दिली. चौथ्या सामन्यात तळाच्या फळीत अक्षर पटेलने ११ चेंडूंत नाबाद २१ धावांचे योगदान दिले. सातव्या आणि आठव्या स्थानावर अष्टपैलूंचा भरणा असल्याने संघ बळकट बनला आहे.
अर्शदीप सिंग हा गोलंदाजीत बुमराहसोबत वेगवान गोलंदाजीत प्रभावी ठरला. कुलदीप यादवच्या अनुपस्थितीतही वरुण चक्रवर्ती, अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीचे त्रिकूट भारताच्या विजयाची ताकद आहे. दुसरीकडे, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन हे फलंदाजीत मोलाची भूमिका बजावतात. दुबेने २३ चेंडूंत ४९ धावा करीत तिसरा सामना जिंकून दिला होता. चौथ्या सामन्यात वॉशिंग्टनने ३ धावांत ३ बळी घेत सामना लवकर संपविला.