आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने सामने येणार आहेत. घरच्या मैदानावर होत असलेल्या या अंतिम लढतीत विजय मिळवून विश्वविजेतेपद आपल्याकडेच कायम राखण्याचा गतविजेत्या भारतीय संघाचा प्रयत्न असेल, तर पहिल्याच विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याच्या इराद्याने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, या अंतिम लढतीसाठी भारतीय संघानं आपल्या अंतिम ११ खेळाडूंची नावं जवळपास निश्चित केली आहेत.
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी तशी संमिश्र अशीच झाली आहे. त्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांचा फॉर्म हा भारतीय संघव्यवस्थापनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे या दोघांनाही अंतिम सामन्यासाठी संघातून डच्चू मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच त्यांच्या जागी रिंकू सिंह आणि कुलदीप यादव यांना संधी मिळेल, अशं बोललं जात होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे या लढतीत भारतीय संघ उपांत्य लढतीत खेळलेल्या खेळाडूंसहच मैदातान उतरणार आहे.
या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून फलंदाजीमध्ये सलामीवीर संजू सॅमसन आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांनी चमक दाखवली आहे. तसेच हार्दिक पांड्या, शिवम दुबे यांनीही अष्टपैलू कामगिरी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र आज होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सांघिक कामगिरी उंचवावी लागेल.
अंतिम सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.