Join us
Daily Top 2Weekly Top 5

१९८३ आणि २०११ च्या जेतेपदासमोर टी-२० वर्ल्ड कपच्या तिन्ही ट्रॉफी फिक्या! असं का म्हणाले मांजरेकर?

१९८३ आणि २०११ मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या तुलनेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी काहीच नाही, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:23 IST

Open in App

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील दहाव्या हंगामातील जेतेपद भारतीय संघासाठी अनेक गोष्टींमुळे खास ठरले.  पहिल्यांदाच एखाद्या संघाने सलग दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकले. एवढेच नाही तर या स्पर्धेत पहिल्यांदाच एका संघाने तिसऱ्यांदा हा किताब जिंकला. घरच्या मैदानात ही स्पर्धा जिंकण्याचा खास विक्रमही भारतीय संघाच्या नावे झाला. पण तरीही भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय माजरेकर यांना याचं अप्रूप वाटत नाही. १९८३ आणि २०११ मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या तुलनेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी काहीच नाही, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टी-२० जगतात टीम इंडियाचा दबदबा

भारतीय संघाला यंदाच्या हंगामातील जेतेपद मिळवून  देताना सूर्यकुमार यादव याने कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारतीय संघाला पहिली वहिली वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली होती. २००७ मध्ये धोनीनं पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. गत हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली होती. आता सूर्यकुमार यादवनं सलग दुसऱ्या जेतेपदासह टीम इंडियाचा टी-२० मधील दबदबा दाखवून दिला आहे. 

"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

संजय मांजरेकरांना टी-२० यशाचं अप्रूप वाटत नाही, म्हणाले...

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यशाची वनडे वर्ल्ड कपमधील अविस्मरणीय कामगिरीशी तुलनाच होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. १९८३ आणि २०११ मध्ये कपिल पाजी आणि महेंद्रसिंह धोनीनं जे करून दाखवलं त्याला तोड नाही, त्याचे महत्त्व नेहमीच कायम राहिल, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. 

संजय मांजरेकर यांनी नेमकं काय म्हटलं?

आपण विश्वविजेतेपदांकडे योग्य आणि वास्तव दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आव्हानाची तीव्रता आणि त्या विजयाचे महत्त्व (पावित्र्य) या दृष्टीने पाहिले तर भारतीय संघातील कोणत्याही हंगामातील टी-२० विश्वचषकातील यश हे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या ५० षटकांच्या विश्वचषकांच्या जवळपासही येत नाहीत.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार यादवरोहित शर्मामहेंद्रसिंग धोनीकपिल देवभारतीय क्रिकेट संघ