Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाच्या 'मिशन टी-२० वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात, इतिहास घडवण्याची मोठी संधी!

T20 World Cup 2026: आजपासून टीम इंडिया आपल्या विश्वविजेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरत आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात भारतासमोर अमेरिकेचे आव्हान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:51 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: गत विश्वविजेते म्हणून 'टी-२०' विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारा यजमान भारतीय संघ आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने शनिवारपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघ आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकाविरुद्ध खेळेल अमेरिका संघ तुलनेत नवखा संघ असला, तरी भारतीय संघ त्यांना कमी लेखण्याची चूक निश्चित करणार नाही. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत याच अमेरिका संघाने पाकिस्तानसारख्या कसलेल्या संघाला पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, त्यांनी भारतालाही सहजासहजी विजय मिळवू दिला नव्हता. त्यामुळे, भारतीय संघ अमेरिकाविरुद्ध पूर्ण ताकदीनेच खेळ करेल, स्पर्धा इतिहासात कोणत्याही संघाला सलग दोनवेळा टी-२० विश्वचषक उंचावता आलेला नाही. हा इतिहास बदलण्याची भारताकडे संधी आहे.

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कायम फलंदाजीस पोषक मानली जाते. येथे अनेकदा धावांचा वर्षाव पाहण्यास मिळाला आहे. शनिवारीही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, दव या सामन्यात निर्णायक भूमिका निभावेल. त्यामुळे, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे मोठी धावसंख्या उभारावीच लागेल. अशा परिस्थितीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.

सुवर्णसंधी भारतीयांकडे आली आहे. शिवाय, भारताकडे घरच्या मैदानावर पहिला टी-२० विश्वचषक पटकावणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवण्याची संधीही आहे.विराट कोहली आणि रोहित शर्मा या फॉरमॅटमधून निवृत्त झाले असले, तरीही भारत अजूनही सर्वांत मजबूत संघ मानला जात आहे. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर भारताने ९ मालिका जिंकल्या असून, यामध्ये गेल्यावर्षीच्या आशिया चषकाचाही समावेश आहे. भारतासाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा तळपू लागली आहे.

'मुंबईकरांचे' आव्हान अमेरिका संघ भारताच्या तुलनेत नवखा असला, तरी संलंग्न देशांमध्ये या संघाने दमदार कामगिरी केली आहे. अमेरिका संघात शुभम रांजणे, हरमित सिंग आणि सौरभ नेत्रावळकर या मूळच्या मुंबईकर खेळाडूंचा समावेश असून त्यांनी याआधी सूर्यकुमार यादवसोबत ड्रेसिंग रूममध्ये वेळ व्यतित केला आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी आणि येथील परिस्थितीची या तिघांना जाणीव असून, त्यांचा अनुभव अमेरिका संघासाठी मोलाचा ठरेल, अमेरिकन संधाने गेल्यावर्षी ९ पैकी ८ सामने जिंकले आहेत. कर्णधार मोनांक पटेलने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांना सायतेजा मुक्कमल्ला आणि मिलिंद कुमार यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. गोलंदाजीत सौरभनेत्रावळकर, हरमित आणि शुभम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मोठ्या फटक्यांचा सराव

भारतीय संघाने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी ईशान किशन, सूर्यकुमार, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांच्यासह वरुण चक्रवर्ती यानेही मोठ्या फटक्यांचा सराव करताना षटकारांचा पाऊस पाडला. यामध्ये रिंकू आणि ईशान यांनी अनेकदा चेंडू विविध स्टैंड्समध्ये भिरकावून दिले. त्याच वेळी, फिरकीपटू कुलदीप यादवने आपली जादू दाखवून देताना काही फलंदाजांना चांगल्या प्रकारे चकवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Team India begins T20 World Cup mission, aiming for historic win!

Web Summary : India starts its T20 World Cup campaign against the USA, aiming to break the record of consecutive wins. Despite Kohli and Sharma's absence, India remains strong, boosted by Yadav's form. Mumbai players in the USA team add local flavor. India practiced power-hitting, preparing for the high-stakes tournament.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतटी-20 क्रिकेटसूर्यकुमार यादव