Syed Mushtaq Ali Trophy 2024 Tilak Varma World Record : भारतीय संघातील युवा बॅटर तिलक वर्मानं (Tilak Varma World Record in T20) टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हैदराबादकडून खेळताना त्याच्या भात्यातून शतकी खेळी आलीये. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने बॅक टू बॅक दोन शतके झळकावली होती. देशांतर्गत टी२० क्रिकेट स्पर्धेतील शतकी खेळीसह त्याने सेंच्युरी हॅटट्रिक नोंदवत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
१४ चौकार अन् १० षटकाराच्या मदतीनं कुटल्या १५१ धावा
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तिलक वर्मा हा हैदराबाद संघाचे नेतृत्व करत आहे. मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने ६७ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १५१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात धावफलकावर २४८ धावा लावल्या. या खेळीसह यशश्वी जैस्वाल याने वर्ल्ड रेकॉर्ड तर सेट केलाच. याशिवाय या युवा बॅटरनं श्रेयस अय्यरलाही मागे टाकले आहे.
अय्यरचाही रेकॉर्ड मोडला
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १५० पेक्षा अधिक धावा करणारा भारताचा तो पहिला फंलदाजही ठरलाय. याआधी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावे होता. टी-२० क्रिकेटमध्ये १४७ धावा ही श्रेयस अय्यरची सर्वोच्च खेळी आहे. तिलक वर्मा हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने बढती मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवत बॅक टू बॅक शतके झळकावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजूनंतर अशी कमागिरी करणारा तो दुसऱा फलंदाज ठरला होता.
दक्षिण आफ्रिकेतून सुरु झाली 'शतकी' मालिका
१३ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातून तिलक वर्माच्या शतकी खेळीचा सिलसिला सुरु झाला होता. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने १०७ धावांची खेळी केली होती. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात त्याने १२० धावांची खेळी करून चार सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करत मालिकावीर पुरस्कारही पटकवला होता. त्यानंतर आता त्याच तोऱ्यात तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना दिसून आले.