Sunil Gavaskar on IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना वादात सापडला आहे, कारण भारतीय चाहत्यांकडून या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे की भारतीय संघ हा फक्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि सरकारच्या सूचनांचे पालन करत आहे. सामना होईल की नाही हे ठरविण्यात खेळाडूंची कोणतीही भूमिका नाही.
गावस्कर यांनी सांगितले की खेळाडू फक्त आदेशांचे पालन करत आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकारसारख्या उच्च अधिकाऱ्यांनी घेतल्याचे त्यांनी आजतकशी बोलताना सांगितले. काही महिन्यांपूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला घडला. त्यामध्ये २६ लोक मारले गेले होते. प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरमार्फत हल्ला केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडले होते. त्यामुळे आता हा क्रिकेट सामनाही भारताने खेळू नये, असे चाहत्यांचे मत आहे.
गावसकर काय म्हणाले?
"भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याबद्दलचा निर्णय हा शेवटी सरकारचा आहे. सरकार जो कोणताही निर्णय घेईल, त्याचे पालन खेळाडू आणि बीसीसीआयला करावेच लागते. वैयक्तिकरित्या तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं. शेवटी, हा सरकारचा निर्णय आहे आणि या प्रकरणात त्याचीच अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे खेळाडूंना यात दोष देणे योग्य ठरणार नाही," असे गावसकरांनी स्पष्टपणे सांगितले.