Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 : एका बाजूला आयपीएलचा थरार सुरु असताना दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेच्या यजमानपदाखाली सुरु असलेल्या तिरंगी वनडे मालिकेत खेळताना दिसत आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजयही नोंदवला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील वनडे सामना प्रत्येकी ३९-३९ षटकांचा खेळवण्यात आला. स्नेह राणाच्या गोलंदाजीच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन महिला संघ १४७ धावांवर आटोपला. त्यानंतर प्रतिका रावलच्या अर्धशतकासह स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने २९.४ षटकात सामना खिशात घातला.
प्रतिका रावलचे अर्धशतक, स्मृती मानधनासह हरलीन देओलचाही दिसला तोरा
श्रीलंकेच्या महिला संघाने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाकडून प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडीनं डावाची सुरुवात केली. स्मृती मानधना ४६ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाली. त्यानंतर प्रतिका रावलनं नाबाद अर्धशतकी खेळीसह हरलीन देओलच्या साथीनं सामना जिंकला. प्रतिका रावलने ५२ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. याशिवाय हरलीन देओलनं ७१ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली.
PBKS vs KKR : अनकॅप्ड प्रियांश-प्रभसिमरन जोडीची कमाल; मोडला ख्रिस गेल-केएल राहुलचा रेकॉर्ड
गोलंदाजीत स्नेह राणासह दीप्तीचा जलवा
पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकन संघाची अवस्था खूपच बिकट झाली. हसिनी परेराच्या ३० धावा वगळता अन्य कोणत्याही श्रीलंकन बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. दुसरीकडे भारतीय फिरकीतील जादू दिसली. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय दीप्ती शर्मा आणि नल्लापुरेड्डी चरणी हिने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. या तिरंगी वनडे मालिकेत भारतीय संघ आपला दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २९ एप्रिलला खेळताना दिसेल.