Sourav Ganguly Gautam Gamhir on IND vs SA 2nd Test: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पराभव केला आणि कसोटी मालिका २-०ने जिंकली. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४८९ धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २०१ धावांत संपला. तिसऱ्या डावात आफ्रिकेने २६० धावा करत भारताला ५४९ धावांचे महाकाय लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना भारताचा डाव १४० धावांत आटोपला आणि भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा ४०८ धावांनी पराभव झाला. पराभवानंतर सारेच निराश झाले, पण माजी कर्णधार सौरव गांगुली मात्र सामन्यानंतर एका गोष्टीमुळे आनंदी झाला.
गांगुली आनंदी का?
गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाचा ४०८ धावांनी मोठा पराभव केला. धावांच्या बाबतीत हा टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. तेव्हापासून, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु या सर्वांमध्ये गुवाहाटीच्या खेळपट्टीने सर्वांना आश्चर्यचकित केले. माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली बारसापारा स्टेडियममधील खेळपट्टी पाहून प्रभावित झाला. गुवाहाटी कसोटीच्या समाप्तीनंतर, गांगुलीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, गुवाहाटी, पहिल्या कसोटीबद्दल अभिनंदन. शानदार कसोटी खेळपट्टी. स्टेडियमच्या सुविधांबद्दल मला आनंद वाटला, मला चांगला अनुभव आला. फलंदाज आणि गोलंदाजांसाठी मदत मिळत होती. यानसेनचे पाच बळी, धावा काढणारे फलंदाज आणि चौथ्या -पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका हा प्रकार अप्रतिम होता. दक्षिण आफ्रिका खूप सरस ठरली. भारतीय संघ एका परिवर्तनातून जात आहे. भविष्यात ते सुधारणा करतील.
आफ्रिकेच्या विजयानंतर कर्णधार वबुमा काय म्हणाला?
कर्णधार टेंबा बवुमा म्हणाला, "दुखापतीमुळे मी दोन महिने क्रिकेटपासून दूर होतो. त्यानंतर कमबॅक करून असा विजय मिळणे खूपच खास आहे. भारतात येऊन त्यांना २-०ने हरवणे सोपे नाही. सध्या आमच्या संघाचा सुवर्णकाळ सुरू आहे. हा मालिका विजय खूपच अभिमानास्पद आहे. आमच्यावर केलेल्या टीकेला आणि प्रश्नांना हे उत्तर आहे. आता आमच्या खेळाडूंच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. आम्ही केलेली तयारी योग्य होती. मुथूसामी सारख्या नवख्या खेळाडूने केलेली खेळी अप्रतिम होती. संघ म्हणून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आता तो वाढतच जाईल."