Smriti Mandhana Marriage Postponed: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिचा विवाह अचानक पुढे ढकलण्यात आला. संगीतकार पलाश मुच्छलसोबत ती २३ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार होती. सांगलीमध्ये हा विवाहसोहळ रंगणार होता. पण अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांच्या तब्येत बिघडली. सुरुवातीला ही एक किरकोळ समस्या असल्याचे मानले जात होते, परंतु नंतर प्रकृती अधिकच बिघडल्यावर त्यांना ताबडतोब सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान, स्मृती मंधानाने काही पोस्ट हटवल्या आहेत, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्मृती मंधानाने काही पोस्ट हटवल्या
स्मृती मंधानाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांच्यानुसार, स्मृतीने स्वतःहून निर्णय घेतला आहे की तिचे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न होणार नाही. तिने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. यादरम्यान, स्मृतीने सोशल मीडियावरही तिचे दुःख व्यक्त केले. तिने तिच्या साखरपुड्याची घोषणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला. तसेच इंस्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित इतर सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या. स्मृतीने सोशल मीडियावर अचानक इतके मोठे पाऊल उचलल्यामुळे चाहतेही हैराण झाले आहेत.
डिलीट की 'हाईड'?
स्मृतीने एका मजेदार इंस्टाग्राम रीलद्वारे पलाश मुच्छलशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. २००६ मध्ये आलेल्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील 'समझो हो ही गया' गाण्यावर नाचताना मंधानाने तिच्या चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली होती. व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी देखील होत्या. तथापि, ही पोस्ट आता स्मृती मंधानाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसत नाही. ही पोस्ट किने डिलीट केली की हाईड केली हे अजून स्पष्ट झालेला नाही.
पलाशने स्मृतीला मैदानात केले प्रपोज
दरम्यान, पलाश मुच्छलनेही त्यांच्या लग्नापूर्वी स्मृती मंधानाला एक मोठे सरप्राईज दिले होते. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्याने तिला प्रपोज केले होते. पलाशने स्वतः २१ नोव्हेंबरला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडीओ त्याने डिलीट केलेला नाही.