Smriti Mandhana Wedding: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार-चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे हा विवाह समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ( father Shrinivas Mandhana discharged). मात्र पलाश (Palaash Muchhal) सोबतचे लग्न अद्यापही लांबणीवरच पडल्याचे चित्र आहे.
डॉक्टरांचे म्हणणे काय?
सोमवारी सकाळी श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही. तपासणीच्या वेळी करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या शरीरात कोणतेही ब्लॉकेजेस आढळले नाहीत. त्यामुळे मानधना कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. २३ नोव्हेंबरला लग्नाच्या दिवशी सकाळी नाश्ताच्या वेळी श्रीनिवास मानधना यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांच्या अचानक आलेल्या या वैद्यकीय समस्येमुळे स्मृतीने थेट लग्नाचे सर्व कार्यक्रम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
पलाशही रुग्णालयात
दरम्यान, या तणावाचा परिणाम पलाश मुच्छलवरही झाला. श्रीनिवास यांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे आणि अचानक आलेल्या ताणामुळे पलाशलाही तीव्र ऍसिडिटी आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात आले. त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या दोन्ही कुटुंबे घरातील मंडळींचे आरोग्य जपण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे अद्यापही लग्न स्थगितच ठेवण्यात आले आहे.