Smriti Mandhana Century Record, INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना शतक झळकावण्यात यशस्वी ठरली. ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतील पराभवानंतर तिसरा सामना पर्थमध्ये खेळवला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकात २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव २१५ धावांवर आटोपला. भारताला ८३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण सांंगलीच्या स्मृती मंधानाने दमदार शतक ठोकत इतिहास रचला.
स्मृती मंधानाचा धमाकेदार विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाने १०३ चेंडूत शतक पूर्ण केले. तिने १०५ धावांची खेळी केली. त्यात १४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. शतकानंतर ती जास्त वेळ क्रीजवर राहू शकली नाही. १०५ धावा करून ती बाद झाली. २०२४ मधील तिचे हे चौथे वनडे शतक होते. यासह ती महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू ठरली. महिला वनडे क्रिकेटमध्ये ७ खेळाडूंनी एका वर्षात ३ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. पण मंधाना ही चार शतके ठोकणारी पहिलीच खेळाडू ठरली.
महिला वनडेत सर्वाधिक शतके
या खेळीसह स्मृतीने तिच्या वनडे कारकिर्दीत ९ शतके पूर्ण केली. ती भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी फलंदाज ठरली आहे. याशिवाय, महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ती चौथ्या स्थानावर आली आहे. स्मृती मंधाना व्यतिरिक्त, नॅट सायव्हर ब्रंट, शार्लोट एडवर्ड्स आणि चामरी अटापट्टू यांनी देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ९ शतके झळकावली आहेत. तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग १५ शतकांसह या यादीत अव्वल आहे.