Smriti Mandhana Breaks Mithali Raj's Record : भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात धमाकेदार खेळीसह एका डावात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. २८ वर्षीय डावखुऱ्या बॅटरनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. तिने जेमिमा रॉड्रिग्ज (३९) च्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची दमदार भागीदारी रचली. त्यानंतर तिने रघवी बिस्ट (३१*) च्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली.
त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०१७ धावा केल्या. धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज महिला निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १५९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय महिला संघाने हा सामना ६० धावांनी जिंकत मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.
स्मृती मानधनानं साधला मोठा डाव, मिताली राजच्या विक्रम मोडला
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना ७७ धावांच्या खेळीसह स्मृती मानधना हिने माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला. टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे. मितालीने फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत भारतासाठी १९२ धावा केल्या होत्या. स्मृती मानधनानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत हा विक्रम मागे टाकला. या मालिकेत तिने १९३ धावा केल्या.
वर्ल्ड रेकॉर्डही झाला नावे
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिन्ही सामन्यात स्मृती मानधनाच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीसह तिने महिला T20I मध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. आता हा विश्वविक्रमही स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे.
भारतीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्ड्स
- स्मृती मानधना – १९३ वि वेस्ट इंडीज (२०२४)
- मिताली राज – १९२ वि दक्षिण आफ्रिका (२०१८)
- जेमिमा रॉड्रिग्ज - १९१ वि श्रीलंका (२०१८)
- स्मृती मानधना – १८० वि न्यूझीलंड (२०१९)
- हरमनप्रीत कौर – १७१ वि वेस्ट इंडीज (२०१६)
आतापर्यंत १४८ टी-२० सामन्यांमध्ये स्मृती मानधनानं ३० वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर बेट्सने १७१ टी-20 सामन्यांमध्ये २९ वेळा अशी कामगिरी केली आहे.
महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावसंख्येचा रेकॉर्ड
- स्मृती मानधना (भारत) – ३०
- सुझी बेट्स (न्यूझीलंड) – २९
- बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) – २५
- स्टॅफनी टेलर (वेस्ट इंडीज) – २२
- सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – २२
याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०६ चौकार मारण्याचा विक्रमही आता स्मृतीच्या नावे झाला आहे. एवढेच नाही तर एका कॅलेंडर इयरमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला बॅटरच्या यादीतही ती टॉपला पोहचलीये. २०२४ या वर्षात तिने २३ टी-२० सामन्यात ७६३ धावा केल्या आहेत.