Smriti Mandhana in Public viral video: भारतीय स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना तिचे लग्न मोडल्यानंतर अखेर पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसली. बुधवारी (१० डिसेंबर) ती नवी दिल्लीमध्ये दिसली. तिथे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिची मॅनेजर नुपूर कश्यप या दोघींनी स्मृतीला मिठी मारून तिचे स्वागत केले. स्मृती आणि हरमनप्रीत दोघीही सध्या भारत मंडपम येथे होणाऱ्या अमेझॉनच्या 'संभव शिखर परिषदे'ला उपस्थित राहण्यासाठी राजधानीत आल्या आहेत. स्मृतीने ७ डिसेंबरला घोषणा केली की तिचे लग्न मोडले असून आता ती केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भारतासाठी ट्रॉफी जिंकण्यासाठी रिलेशनशिपपासून अंतर राखणार आहे.
स्मृती श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार
स्मृतीने ज्या दिवशी लग्न मोडल्याची घोषणा केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी, स्मृतीचा भाऊ श्रवणने तिचा सराव करत असतानाचा फोटो शेअर केला. त्यानंतर कालच श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी स्मृतीचा भारताच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला. २१ डिसेंबरपासून विशाखापट्टणम येथे ही मालिका सुरू होत आहे.
स्मृतीसाठी कठीण काळ
सोमवारी स्मृतीने तिचे लग्न मोडल्याची घोषणा केली आणि मग इंस्टाग्राम पासून इंटरनेटवर सर्वत्र खळबळ उडाली. तिने लिहिले की, माझ्यासाठी शांतता म्हणजे नियंत्रण आहे. मी आता खेळावर लक्ष केंद्रित करणार आहे.
दरम्यान, पलाश मुच्छलने डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला सरप्राईज देत प्रपोज केले होते. हे तेच स्टेडियम आहे जिथे भारताने महिला विश्वचषक अंतिम सामना जिंकला होता. दोघांचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ ला सांगलीत होणार होते. पण लग्नाच्या दिवशी सकाळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असे सांगण्यात आले. त्यानंतर पलाशबाबत विविध गोष्टी इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्या. आणि अखेर दोन आठवड्यांनंतर दोघांनीही लग्न मोडल्याची घोषणा केली. आधी स्मृतीने लग्न मोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर पलाशने एक निवेदन जारी केले. त्यामध्ये म्हटले होते की हे लग्न मोडले आहे आणि त्याच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध तो कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे.