Smriti Mandhana Engagement with Palash Muchhal: टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि विश्वचषक विजेती क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने अनोख्या पद्धतीने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. तिने तिच्या आयुष्यातील हा खास क्षण शेअर करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. तिने एक इंस्टाग्राम रील शेअर केली, ज्यामध्ये तिच्यासह टीम इंडियाच्या इतर खेळाडूंचाही समावेश होता. स्मृतीचे लग्न २३ नोव्हेंबरला गायक-संगीतकार पलाश मुच्छलशी होत आहे. त्याआधी तिचा साखरपुडा पार पडला. त्याची घोषणा करण्यासाठी स्मृतीने जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांच्यासह रील शेअर करत माहिती दिली.
२००६मध्ये प्रदर्शित झालेला 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटातील 'समझो हो ही गया' गाण्यासह एक उत्तम कोरिओग्राफ केलेले रील स्मृती आणि मित्रमंडळींनी तयार केले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेवटच्या फ्रेममध्ये मंधानाने साखरपुड्याची अंगठी कॅमेऱ्यासमोर धरली आणि अनोख्या पद्धतीने साखरपुडा झाल्याची घोषणा केली.
पलाशने आधीच दिले होते संकेत
ऑक्टोबरमध्ये इंदूरमधील स्टेट प्रेस क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, पलाशने स्मृतीसोबतच्या नात्याचे संकेत दिले. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले नसले तरीही त्यांनी मजेशीर पद्धतीने सांगितले होते की, स्मृती मंधाना लवकरच 'इंदूरची सून' बनेल.
महिला विश्वचषकात स्मृतीची दमदार कामगिरी
भारताने नुकताच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला. या स्पर्धेत स्मृती मंधानाची कामगिरी अतिशय प्रभावी होती. तिने नऊ डावांमध्ये ५४.२२च्या सरासरीने ४३४ धावा केल्या, ज्यात न्यूझीलंडविरुद्धच्या दमदार शतकाचा समावेश होता. स्मृती महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाजही बनली. तिने २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत मिताली राजचा ४०९ धावांचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्वार्ड ही ४७० धावांसह या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली, पण स्मृतीच्या धावांच्या बळावर भारताने कायम चांगली सलामी दिली आणि त्यामुळेच भारतीय महिला विश्वविजेत्या बनल्या.