Join us

शुबमन गिलचा तुफान बॅटिंग फॉर्म वाढवतोय पाकिस्तानच्या बाबर आझमचं टेन्शन, 'हे' आहे कारण

Shubman Gill Babar Azam, IND vs PAK Champions Trophy 2025 : शुबमन गिलने इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत ठोकलं धमाकेदार शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 19:17 IST

Open in App

Shubman Gill Babar Azam, IND vs PAK Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल तुफान फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत त्याने एक दमदार शतक ठोकत सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. मालिकावीर म्हणूनही त्याने अप्रतिम कामगिरी केली. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत बाबर आझमला मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलच्या सामन्यातही २९ धावांवर बाद झाला. शुबमन गिलचा सध्याचा फॉर्म बाबर आझमला चांगलंच टेन्शन देतोय. जाणून घेऊया त्यामागचं कारण.

गिलच्या फटकेबाजीने बाबर चिंतेत का?

शुभमन गिल सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे ७८१ रेटिंग गुण आहेत. तर बाबर आझम त्याच्यापेक्षा फक्त पाच रेटिंग पॉइंट्सने पुढे आहे आणि तो वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. बाबर तिरंगी मालिकेत अपयशी ठरला. त्यामुळे त्याचे रेटिंग पॉइंट्स नक्कीच कमी होतील आणि शुभमन गिल नंबर १ फलंदाज बनेल. शुभमन गिलला पुढील बुधवारी ही आनंदाची बातमी मिळू शकते कारण आयसीसी त्या दिवशी रँकिंग जाहीर करते. तसेच सध्या बाबर आझमचा फॉर्म पाहता तो पुन्हा लवकर शुबमन गिलला मागे टाकेल अशी शक्यता नाही.

बाबर आझम सारखाच ठरतोय 'फ्लॉप'

बाबर आझम सध्या सातत्याने फ्लॉप होतोय. एकेकाळी बाबर आझम खूपच चांगल्या फॉर्मात होता. पण पाकिस्तानी संघाच्या एका नवी पद्धतीमुळे बाबरचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी संघाने तिरंगी मालिकेत बाबर आझमला सलामीला खेळवल्याने तो नाराज झाला. सहसा बाबर वनडे सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सौद शकील जखमी झाल्यानंतर त्याला सलामीला उतरवण्यात आले. तिरंगी मालिकेतील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बाबर आझमने २३ चेंडूत १० धावा केल्या. यानंतर, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावा केल्या आणि जेतेपदाच्या लढतीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध २९ धावा केल्या.

शुभमन गिलचा दमदार फॉर्म

शुभमन गिल सध्या चांगल्या लयीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत गिलने ८६ पेक्षा जास्त सरासरीने २५९ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतके आणि एक शतक समाविष्ट आहे. गिलची एकदिवसीय सरासरी सध्या ६०च्या आसपास आहे. तो सर्वात कमी डावांमध्ये ७ एकदिवसीय शतके आणि २५०० एकदिवसीय धावा करणारा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे. अशा परिस्थितीत, तो नंबर अव्वलस्थान मिळवण्यासाठी खूपच जवळ आहे.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५बाबर आजमशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान