आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधीच भारतीय संघातील प्रिन्स शुबमन गिलनं वनडे क्रिकेट क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकवला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत आता शुबमन गिल एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वलस्थानावर पोहचलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबरला धोबीपछाड देत गिलनं पटकवला नंबर वनचा ताज
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिलनं ७९६ रेटिंग पॉइंट्सह वनडेतील नंबर वनचा ताज पटकवला आहे. भारतीय बॅटरनं पाकचा स्टार बाबर आझमला धोबीपछाड दिलीये. जो बऱ्याच काळापासून वनडेत नंबर वनचा ताज मिरवत होता. बाबर आझम ७७३ गुणांसह आता एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मासह वनडे रँकिंगमधील टॉप ५ मधील फलंदाज
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड विरुद्धच्या कटक वनडेत त्याने दमदार शतकी खेळी केली होती. त्याच्या खात्यात ७६१ पॉइंट्स जमा आहेत. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन (७५६ रेटिंग पॉइंट्स) आणि न्यूझीलंडचा डॅरियल मिचेल (७४० रेटिंग पॉइंट्स) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
विराट कोहलीसह श्रेयस अय्यर टॉप १० मध्ये
भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली सध्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. त्याच्या भात्यातून मोठी खेळी आलेली नाही. पण इंग्लंड विरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले होते. तो ७२७ रेटिंग पॉइंट्ससह क्रमवारीत सहाव्या स्थानावर असून श्रेयस अय्यर ६७९ रेटिंग पॉइंट्ससह नवव्या स्थानावर आहे.