Shreyas Iyer Comeback Team India: न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (IND vs NZ ODI) श्रेयस अय्यरची निवड करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. जर श्रेयसने ती अट पूर्ण केली नाही, तर त्याला टीम इंडियामधून वगळण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून "रिटर्न टू प्ले" मंजुरी मिळविण्यासाठी श्रेयस अय्यरला दोन मॅच सिम्युलेशन सेशन्स पास करावे लागतील. रिपोर्ट्सनुसार श्रेयसने चार बॅटिंग आणि फिल्डिंग सेशन्स पूर्ण केले आहेत, परंतु त्याच्या सध्याच्या फिटनेसचा विचार करता, २ आणि ५ जानेवारी रोजी आणखी दोन मॅच-सिम्युलेशन सेशन्स घेण्यात येतील.
श्रेयस अय्यरचे पुढे काय होणार?
श्रेयस अय्यर थेट संघात परतणार होता, परंतु त्याच्या रिकव्हरीवर काम करणाऱ्या वैद्यकीय पथकाने असे ठरवले की त्याचे स्नायूंचे वजन कमी झाले आहे, ज्यामुळे त्याला पुढील चाचणीची आवश्यकता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो मुंबईसाठी दोन सामने खेळणार होता, परंतु त्याला सामने खेळता आले नाहीत. आता, बीसीसीआय निवड समिती ३ जानेवारीला टीम इंडियाची निवड करणार आहे आणि त्यात अय्यरचे स्थान धोक्यात असल्याचे दिसत आहे. बीसीसीआय श्रेयसचे पहिले मॅच सिम्युलेशन सेशन पाहिल्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियात अय्यरला झाली होती दुखापत
ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्याने झेल घेण्यासाठी उडी मारली पण त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यामुळे तो दोन महिने खेळापासून दूर राहिला. त्याचे ६ किलो वजनही कमी झाले आहे. त्यामुळे, त्याचे वजन परत मिळवण्यासाठी आणि पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी त्याला लागणार आहे असा अंदाज आहे.
जर श्रेयस अय्यर परतला...
जर श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली तर ऋतुराज गायकवाडला संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अय्यरच्या अनुपस्थितीत, गायकवाडने दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि दमदार शतकही ठोकले केले. जर अय्यर परतला तर गायकवाडला संघातून वगळले जाऊ शकते. तसेच, अशीही चर्चा रंगली आहे की, अय्यरची निवड झाली नाही तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये चार सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिकलही संघात येऊ शकतो.