अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या काबूल प्रीमियर लीगमध्ये सेदिकुल्लाह अटलने एका षटकात ४८ धावा कुटल्या. त्याने ५६ चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह ११८ धावांची नाबाद खेळी खेळली. त्यामुळे त्याच्या संघ शाहीन हंटर्सने ६ गडी गमावत २१३ धावा केल्या आणि आबासिन डिफेंडर्सला १२१ धावांवर गुंडाळून ९२ धावांनी विजय मिळवला.
काबूलच्या मैदानावर आबासिन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाहीन हंटर्सने धावांचा डोंगर उभा केला. शाहीनच्या २९ धावांत तीन विकेट पडल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सेदीकुल्लाह अटलने तुफानी फलंदाजीने कहर केला. अटलने डावाच्या १९व्या षटकात ४८ धावा चोपल्या. त्यामुळे त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद २१३ धावा केल्या.
२१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आबासीन संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि एका टप्प्यावर त्यांच्या ५५ धावांत ५ विकेट्स पडल्या होत्या. कर्णधार फरमानुल्लाहने ३१ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. पण, दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्या आणि अबासीनचा संघ १८.३ षटकांत १२१ धावांत गारद झाला.