Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या आगामी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानला स्थान मिळाले नाही. ८ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या सरफराज खानपेक्षा अनुभवी फलंदाज करुण नायरला प्राधान्य देण्यात आले. पण संघातून वगळल्यानंतर सरफराज खान इंग्लंडमध्ये खूप धावा करत आहे. सरफराज खानने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात इंडिया-अ साठी ९२ धावांची शानदार खेळी केली होती. आता सरफराज खानने इंट्रा-स्क्वॉड सामन्यात शतक झळकावले आहे. हा सामना बेकेनहॅम येथील काउंटी ग्राउंडवर भारत आणि इंडिया-अ दरम्यान खेळला जात आहे.
इंट्रा-स्क्वॉड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सरफराज खानने इंडिया-अ साठी ७६ चेंडूत १०१ धावा केल्या. त्यात ज्यामध्ये १५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शतक पूर्ण केल्यानंतर तो रिटायर्ड झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.
सरफराज खानला दीर्घ प्रतीक्षेनंतर २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १ शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सरफराज खानचा शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होता. तो २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.
बुमराहला एकही विकेट मिळाली नाही, ऋतुराजही अपयशी
या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साई सुदर्शनने ३८ धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाडला खातेही उघडता आले नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या, परंतु तो खूप महागडा ठरला. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. या इंट्रा-स्क्वाड सामन्याच्या पहिल्या दिवशी केएल राहुल आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाले होते. तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही विकेट घेतल्या होत्या.
Web Title: sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.