भारतीय विकेट किपर बॅटर संजू सॅमसन सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेट करिअरमध्ये अगदी शिखरावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाकडून मालिकेत दोन शतके झळकावल्यानंतर तो आता देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळताना दिसतोय.
संजूची फटकेबाजी, केरळानं मारली बाजी
केरळा संघाचे नेतृत्व करताना या स्पर्धेतील काही सामन्यात त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण गोवा विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा तळपली. या सामन्यात त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं १५ चेंडूत ३१ धावांची धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपर बॅटरची ही खेळी ४ चौकार आणि २ उत्तुंग षटकाराने बहरलेली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे VJD पद्धतीने निकाली लागलेल्या या सामन्यात संजूच्या नेतृत्वाखाली केरळ संघानं ११ धावांनी विजय नोंदवला.
संजूसह या फलंदाजांनी दिलं योगदान
पावसाच्या व्यत्ययामुळे केरळा विरुद्ध गोवा यांच्यातील सामना हा १३-१३ षटकांचा करण्यात आला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना कॅप्टन संजू सॅमसन याने रोहन कुन्नुम्मलच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. संजू १५ चेंड़ूत ३१ धावा करून तंबूत परतला. त्याने २०६.६६ च्या स्ट्राइक रेटनं या धावा कुटल्या. रोहननं १४ चेंडूत केलेल्या १९ धावा आणि सलमान निझार ३४ (२०), अब्दुल बासिथ २३(१३) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर केरळा संघाने निर्धारित १३ षटकात ६ बाद १४३ धावा केल्या होत्या.
इशान गाडेकरचा कडक रिप्लाय, पण...
या धावसंख्येचा पाठलाग करताना गोवा संघाकडून सलामीवीर इशान गाडेकर याने २२ चेंडूत ४५ धावांची नाबाद खेळी केली. पण शेवटी पावसामुळे पुन्हा खेळ थांबला तेव्हा गोवा संघानं ७.५ षटकात २ बाद ६९ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईसची समतुल्य व्हीजेडी मेथडनुसार केरळा संघाने ११ धावांनी सामना खिशात घातला.