IND vs SA 1st Unofficial ODI : ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय 'अ' संघाने दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अनौपचारिक वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियासमोर २८६ धावांचे आव्हान ठेवले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून सामन्याला कलाटणी देणारी शतकी खेळी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्माकडून मोठा धमाका पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तो ३१ धावा करून परतला. त्याच्यासोबत भारताच्या डावाची सुरुवात करणारा सलामीवीर आणि भारती 'अ' संघाचा उपकर्णधार ऋतुराज गायकवाडनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ११७ धावांची खेळी करत संघासाठी सामन्याला कलाटणी देणारा डाव खेळला.
भारतीय संघाने अखेरच्या षटकात जिंकला सामना
ऋतुराज गायकवाडनं पहिल्या अनौपचारिक वनडे सामन्यात १२९ चेंडूत ११७ धावांची दमदार खेळी केली. त्याने या खेळीत १२ खणखणीत चौकार मारले. तिलक वर्मानं या सामन्यात ५८ चेंडूत ३९ धावा केल्या. ही भारतीय संघाकडून दुसऱ्या क्रमांकाची खेळी ठरली. शेवटच्या षटकात निशांत संधू आणि हर्षित राणा जोडीनं भारतीय संघाला ४ विकेट्स आणि ३ विकेट्स राखून संघाचा विजय निश्चित केला.
ऋतुराजच्या सेंच्युरीसमोर तिघांची फिफ्टी ठरली व्यर्थ
पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने अवघ्या ५१ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर डेलानो पोटगिएटर (९० धावा), डायन फॉरेस्टर (७७ धावा) आणि ब्योर्न फोर्टुइन (५८ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २८५ धावांपर्यंत मजल मारली.
गोलंदाजीत अर्शदीप अन् हर्षित राणाचा जलवा
भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, निशांत संधू आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.