Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी: कर्णधार रोहित शर्माची विराट कोहलीसह ४ खेळाडूंना थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला?

Rohit Sharma Team India, Champions Trophy 2025 IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना उद्या बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 21:33 IST

Open in App

Rohit Sharma Press Conference Team India, Champions Trophy 2025 IND vs BAN: इंग्लंडविरूद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने यावेळी स्पर्धेची तयारी आणि इतर महत्त्वाच्या बाबींसदर्भात विचार व्यक्त केले. यावेळी भारतीय कर्णधाराने संघातील ४ खेळाडूंना चांगला खेळ करण्याची ताकीद दिली.

'या' ४ खेळाडूंना रोहितचा संदेश

भारतीय कर्णधाराने सुरुवातीपासूनच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या टॉप ऑर्डर फलंदाजीबाबत भाष्य केले. भारतीय कर्णधाराने ४ फलंदाजांना सर्वांसमोर थेट ताकीद दिली की, त्यांना चांगली कामगिरी करावीच लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, या ४ फलंदाजांमध्ये खुद्द रोहितचाही समावेश आहे. भारतीय कर्णधार म्हणाला, "संघाच्या टॉप-४ फलंदाजांना चांगला खेळ करून दाखवावाच लागेल. त्यांना मोठी खेळी करून धावा काढण्याची गरज आहे, तसे केले तरच संघाला चांगली कामगिरी करता येईल." कर्णधार रोहितने ही 'वॉर्निंग' स्टार फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि स्वतःला दिली. कारण हेच चौघे टीम इंडियाचे टॉप-४ फलंदाज आहेत.

इंग्लंड विरूद्ध भारताच्या टॉप-४ ची कामगिरी

चारही फलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत काही दमदार खेळी केल्या. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी तिन्ही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने २ सामन्यांमध्ये अपयशी ठरला, पण एका सामन्यात त्याने धमाकेदार शतक झळकावले. एका सामन्यात अपयशी ठरलेल्या विराटनेदेखील पुढच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत टीम इंडियाला पुन्हा या चौघांकडून काही मोठ्या खेळीची आवश्यकता असेल. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-बांगलादेश सामन्यात रोहितने शतक झळकावले होते.

फिरकीपटूंबद्दल काय म्हणाला रोहित?

रोहित शर्माने टीम इंडियाच्या फिरकीपटूंबद्दलही उत्तर दिले. टीम इंडियाने स्पर्धेत रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती अशा ५ फिरकीपटूंसह प्रवेश केला आहे. पण रोहित त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. भारतीय कर्णधार म्हणाला, "आमच्याकडे २ फिरकीपटू आहेत आणि उर्वरित ३ अष्टपैलू खेळाडू आहेत. हे तिघेही फलंदाजीत चांगली भूमिका बजावू शकतात. त्यामुळे ही आमची ताकद आहे आणि आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे."

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५रोहित शर्माविराट कोहलीशुभमन गिलश्रेयस अय्यरभारत विरुद्ध बांगलादेश