मुंबई, आयपीएल 2019 : पाच सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना रोहितला झालेली दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.
सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे. पंजाबनेही हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला आहे आणि मुंबईसमोर ते आव्हान उभे करू शकतात. पंजाबच्या आव्हानाची कल्पना असलेल्या मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडेवर कसून सराव केला. मात्र, सराव सत्रात रोहितला दुखापत झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रोहित लंगडत चालताना दिसत होता आणि त्याने सराव सत्रातूनही विश्रांती घेतली. धावण्याचा सराव करतान रोहितचा पाय मुरगळला आणि वेदनेने कळवळत त्याने मैदानावरच लोटांगण घातले. मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्वरीत मैदानावर धाव घेत रोहितवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रोहित ड्रेसिंग रुममध्ये परतला. रोहितच्या दुखपतीबद्दल मुंबई इंडियन्सकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.