रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ महिन्यात दोन ICC ट्रॉफी जिंकल्या. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर UAE च्या मैदानात झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघानं जेतेपद मिळवलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली त्यावेळी रोहितच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी ही गौतम गंभीरकडे आली होती. पण रोहित शर्मानं या जेतेपदाचं श्रेय हे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला दिलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टन्सी गेल्यावर रोहित शर्मानं द्रविडचं नाव घेत गंभीरविरोधात ठोकला शड्डू
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यास खंबीर असताना गंभीरमुळे रोहित शर्माची कॅप्टन्सी गेली, अशी चर्चा रंगत असताना ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं श्रेय थेट द्रविडला देत रोहित शर्मानं अप्रत्यक्षपणे विद्यमान कोच गौतम गंभीरविरोधात शड्डूच ठोकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इथं एक नजर टाकुयात रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला त्यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गंभीर होता कोच, पण रोहित शर्मानं जेतेपदाचं सगळं श्रेय दिलं द्रविडला
टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर मंगळवारी रोहित शर्मा पहिल्यांदाच सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. १२ वर्षांचा दुष्काळ संपवत ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्याबद्दल रोहित शर्माला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने या यशाचं श्रेय हे राहुल द्रविडला दिल्याचे पाहायला मिळाले. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला अन् त्याची जागा गंभीरनं घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तोच कोच होता. पण रोहितनं मात्र सगळं श्रेय द्रविडला दिलं.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
खास पुरस्कार मिळाल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील यशाबद्दल रोहित म्हणाला की, “मला ती टीम खूप आवडायची. त्या संघासोबत खेळण्याचा अनुभव खूप छान होता. ही गोष्ट एका-दोन वर्षांच्या मेहनतीची नाही, तर अनेक वर्षांच्या परिश्रमांच्या जोरावर आम्ही यश मिळवलं. अनेक वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, पण शेवटच्या टप्प्यात संधी हुकली. त्यावेळी सर्वांनी ठरवलं की, आता काहीतरी वेगळं करायला हवं. फक्त विचार करुन आम्ही थांबलो नाही तर तो विचार प्रत्यक्षात उतरवला. हे एका-दोन खेळाडूंच्या बळावर शक्य नव्हतं; सगळ्यांनी तो विचार आत्मसात करणं गरजेचं होतं. आणि सगळ्यांनी ते केलं. “संघाच्या दृष्टीने हे खरोखरच खूप छान होतं. यामुळेच मला आणि राहुल भाईला ( माजी प्रशिक्षक राहुल द्रविड ) २०२४ टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीची योजना आखताना खूप मदत झाली.