ब्रिस्टल : भारताने इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले. तिस-या आणि निर्णायक सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. निराशाजनक सुरूवातीनंतर भारताने पुनरागमन करताना यजमानांना 20 षटकांत 9 बाद 198 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 7 विकेट्स राखून सहज पार केले. शतकवीर रोहित शर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रत्येकी तीन शतक करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला.
रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित करून जगाला मोलाचा सल्ला दिला. सुदान असे या गेंड्याचे नाव असून मार्च 2018 मध्ये त्याचा मृत्यु झाला होता. तिस-या टी-20 मधील हे शतक माझा मित्र सुदान याला अर्पण करतो. जग सुंदर आहे आणि सर्वांना येथे सुखाने नांदता यावे यासाठीचा मार्ग आपल्याला शोधायला हवा, असे भावनिक ट्विट रोहितने केले.
वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार घेणारा रोहित हा पहिलाच क्रिकेटपटू नाही, तर यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसन यानेही असा भावनिक मॅसेज लिहीला होता.