Rohit Sharma Captain vs Ajit Agarkar, IND vs AUS: भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने भारतीय संघ जाहीर केला. त्यात रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून ती जबाबदारी शुबमन गिलकडे देण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही संघात केवळ फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले. या प्रकारानंतर सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय चाहतेही बीसीसीआय आणि सिलेक्टर्सवर काहीसे नाराज असल्याचे दिसत आहेत. तशातच, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याने मोठे विधान केले आहे.
मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने पत्रकार परिषदेत असे सांगितले की ज्या खेळाडूंना दीर्घकाळ संघात टिकून राहायचे असेल, त्यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही खेळत राहायला हवे. तसे न केल्यास गोष्टी कठीण होऊन बसतील. याच मुद्द्यावर स्टीव्ह हार्मिसनने अजित आगरकरला सुनावले आहे.
अजित आगरकरचा शेवट विचित्र होणार...
"दुर्दैवाने अजित आगरकरसाठी त्याचा सिलेक्टर म्हणून सुरू असलेल्या कारकिर्दीचा शेवट अतिशय विचित्र होऊ शकतो. या वादात जर कुणी जिंकू शकेल तर ते माजी कर्णधार (रोहित शर्मा आणि विराट कोहली) जिंकतील, माजी ऑलराऊंडर (अजित आगरकर) जिंकू शकणार नाही. पण अजित आगरकर हे सगळं रोहित-विराटमधील ऊर्जा चेतवण्यासाठी करत असेल तर मात्र हरकत नाही. मग या गोष्टी चांगल्या अर्थाने बाहेर येऊ शकतात. आता अजित आगरकरने पत्ते फेकले आहेत, काय निकाल येतो ते नंतरच कळेल," असे रोखठोक मत स्टीव्ह हार्मिसनने मांडले.
विराटची किंमत तेव्हा कळेल...
"विराट कोहली हा तर फिटनेसच्या बाबतीत खूपच अग्रेसर आहे. त्याच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्याची प्रतिभा पाहता तो आणखी भरपूर धावा करू शकेल यात वाद नाही. वनडे क्रिकेटमध्ये रोहितपेक्षाही विराट जास्त प्रभावी खेळाडू आहे. त्याच्या खेळाची पद्धत ही वनडे जास्त साजेशी आहे. ३५०चा स्कोअर चेस करताना विराट कोहलीची उणीव भारताला भविष्यात नक्कीच भासेल," असेही स्टीव्ह हार्मिसन स्पष्टपणे म्हणाला.