Preity Zinta Punjab Kings : IPL 2025 मध्ये पंजाब किंग्जच्या कामगिरीला सर्व चाहत्यांनी सलाम केला. हा संघ अंतिम फेरीत पोहोचला, पण जेतेपदाला गवसणी घालू शकला नाही. यंदाच्या IPL मध्ये केवळ पंजाबचे खेळाडूच नव्हे तर पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटा हिचीही चर्चा रंगली. प्रीती झिंटा जवळजवळ प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली आणि चाहतेही तिचे कौतुक करताना दिसले. पण आता आयपीएलच्या एका लोकप्रिय खेळाडूने प्रीती झिंटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. हा खेळाडू म्हणजे संदीप शर्मा. त्याने मुलाखतीत सांगितले की, प्रीती झिंटाच्या सांगण्यावरून 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणजेच सामनावीराचे नाव कसे बदलण्यात आले होते.
प्रीती झिंटाबद्दल संदीप शर्माचा खुलासा
संदीप शर्माने मुलाखतीत सांगितले की, बंगळुरूमध्ये झालेल्या एका आयपीएल सामन्यात प्रीती झिंटाने रवी शास्त्रींना सामनावीर बदलण्यास सांगितले होते. संदीप शर्मा म्हणाला, 'बंगळुरूमध्ये झालेल्या एका आयपीएल सामन्यात मी नवीन चेंडूने तीन विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात मी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलला बाद केले होते. पण त्या सामन्यात अक्षर पटेल सामनावीर होणार होता कारण त्याने २५ धावा काढल्या होत्या आणि दोन विकेट्सही घेतल्या होत्या. पण प्रीती झिंटाने रवी शास्त्रींना सांगून सामनावीर बदलला आणि मी सामनावीराचा दावेदार आहे म्हणत तो पुरस्कार मला द्यायला सांगितले. प्रितीने रवी शास्त्रींना 'सँडी' (संदीप शर्मा) असं सांगितलेलं मी स्वत: ऐकले.'
संदीपने श्रेयस अय्यरबद्दल सांगितली महत्त्वाची गोष्ट
संदीप शर्माने श्रेयस अय्यरबद्दलही मोठे विधान केले. तो म्हणाला की, आयपीएलच्या अंतिम फेरीत संघ नेण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही भारताचे कर्णधारही व्हाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे एक वेगळे आव्हान आहे. श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याची चर्चा आहे. कारण तो आयपीएलमध्ये त्याच्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला होता. पण मला ही चर्चा हास्यास्पद वाटते. सूर्यकुमार यादव कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व करत नाहीये, म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो कर्णधारपदाच्या योग्यतेचा नाही. भारतीय संघ पूर्णपणे वेगळा संघ आहे हे चाहत्यांनी समजून घेतले पाहिजे.