PM Modi on India won Asia Cup IND vs PAK: आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहान याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने १९.१ षटकात १४६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक आणि शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने दोन चेंडू राखून हा सामना जिंकला. अंतिम सामना जिंकत भारताने ९व्यांदा आशिया चषक उंचावला. भारताच्या विजयानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचे आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले.
भारतीय संघाने विजयश्री खेचून आणत पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट केला. "खेळाच्या मैदानावर 'ऑपरेशन सिंदूर'. निकाल सारखाच राहिला - भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय फिरकीपटूंची जादुई कामगिरी
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीस बोलावले. सलामीवीर फरहान आणि फखर जमान या दोघांनी दमदार सुरुवात केली. फरहानने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या तर जमानने ३५ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर साईम आयुब याने १४ धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ११३ असताना अयुब बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची घसरगुंडी उडाली. पुढच्या कोणत्याही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार सलमान अली आगा याने सर्वाधिक आठ धावा केल्या. तर तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. भारताकडून कुलदीप यादवने चार तर बुमराह, वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
भारताचा विजय 'तिलक'
१४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा पाच धावांवर, सूर्यकुमार यादव एक धावेवर तर शुबमन गिल १२ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद २० अशी होती. त्यानंतर संजू सॅमसनने तिलक वर्माच्या साथीने भागीदारी करण्यास सुरुवात केली. २४ धावांवर असताना संजू सॅमसन बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यात मोठी भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर भारताला विजयाच्या समीप आणण्यास मदत झाली. शिवम दुबे २२ चेंडू ३३ धावा करून माघारी परतला तर तिलक वर्मा ५३ चेंडूत एकूण ७० धावांवर नाबाद राहिला. रिंकू सिंग याने संपूर्ण स्पर्धेत केवळ एक चेंडू खेळला मात्र तो चेंडू भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एका चेंडूत चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानतर्फे फहीम अश्रफ याने तीन तर शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी एक-एक बळी घेतला.