Pakistan Announces 15 Members Squad For T20 World Cup 2026 : बांगलादेशला हरभऱ्याच्या झाडावर चढवत, पोकळ धमक्यांचा खेळ खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने अखेर टी-२० वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नौटंकीनंतर पाकिस्तानने अखेर टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ निवडला
सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थितीत करत बांगलादेशच्या संघाने भारतीय मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळण्यास नकार दिला. ICC नं अल्टीमेटम दिल्यावरही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. ICC नं कठोर निर्णय घेत त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी करून घेतले. बांगलादेशच्या संघाने भारतीय मैदानातील सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे समर्थन केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाची भूमिका योग्य आहे अशी दवंडी पेटवली. एवढेच नाहीतर वेळ प्रसंगी आपणही त्यांच्यासोबत स्पर्धेबाहेर पडू, अशी पोकळ धमकीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. पण शेवटी या नौटंकीनंतर त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करत ते स्पर्धेत खेळणार हे निश्चित झाले आहे.
T20 World Cup 2026 Controversy : ...तर आम्ही टी २० वर्ल्ड कप खेळणार नाही, पाकची नवी नौटंकी!
बाबर आझमला संधी, रिझवानला दाखवला बाहेरचा रस्ता
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी, २५ जानेवारीला १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. निवड समितीने या स्पर्धेसाठी बाबर आझम, फहीम अशरफ आणि मोहम्मद नवाज यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. मात्र, मोहम्मद रिझवान आणि हारिस रऊफ यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. टी वर्ल्ड कप स्पर्धेत सलमान अली आगा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये पत्रकार परिषदेत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाक संघाची अधिकृत घोषणा केली. या वेळी PCB चे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आणि पुरुष राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य आकिब जावेद, पाकिस्तान टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा आणि व्हाइट-बॉल हेड कोच माइक हेसन उपस्थित होते.
पहिल्यांदाच टी २० वर्ल्ड कप खेळणार हे ६ खेळाडू
पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ६ खेळाडू पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहेत. यात कर्णधार सलमान अली आगासह फहीम अशरफ, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद सलमान मिर्झा, साहिबजादा फरहान आणि उस्मान तारिक यांचा समावेश आहे. पाकिस्तानचा संघ ७ फेब्रुवारीला नेदरलँडसविरुद्धच्या लढतीनं टी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. १० फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या लढतीनंतर १५ फेब्रुवारीला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. नामीबीया विरुद्धच्या लढतीनं ते साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळताना दिसतील. ही लढत १८ फेब्रुवारीला नियोजित आहे.
टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आजम, फहीम अशरफ, फखर झमान, मोहम्मद ख्वाजा (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयूब, शाहीन शाह अफरीदी, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक) आणि उस्मान तारिक.