नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन्ही कसोटी सामन्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर भारतीय कसोटी संघात काही देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती तिसऱ्या क्रमांकासारख्या महत्त्वाच्या स्थानाबाबत आपला दृष्टिकोन बदलण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या तीन दशकांत राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या क्रमांकाची भूमिका उत्कृष्टरीत्या निभावली. परंतु, आता हे स्थान अधिक स्थिर करण्याची गरज बनली आहे. करूण नायर इंग्लंडमधील चार कसोटींत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, तर बी. साई सुदर्शन याला ११ डावांत केवळ २७ च्या सरासरीने धावा काढता आल्या. विशेषतः उपखंडातील फिरकीपटूंविरुद्ध त्याच्या फलंदाजी तंत्रातील कमजोरी स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे त्याला कसोटीसाठी सज्ज होण्यासाठी अधिकाधिक देशांतर्गत क्रिकेट आणि भारत ‘अ’ संघासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चुका दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे, या उच्च स्तरावर जेव्हा खेळाडू वारंवार त्याच चुका करततात, तेव्हा संघात बदल करणे अनिवार्य ठरते. सर्फराज खान आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्यासाठी दारे जवळजवळ बंद झाली आहेत. मात्र, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार आणि रिंकू सिंग या अनुभवी खेळाडूंनी पुन्हा आपले लक्ष वेधले आहे.
तिसऱ्या स्थानासाठी हवा सक्षम पर्याय
भारतीय संघाला सध्या तिसऱ्या क्रमांकावर एक सक्षम फलंदाज आणि पाचव्या क्रमांकासाठी एक मजबूत राखीव फलंदाजाची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी ऋतुराज गायकवाड चांगला पर्याय ठरू शकतो. या हंगामात दोन शतके आणि रणजीमध्ये ९०हून अधिकच्या सरासरीने धावा करून तो मानसिकदृष्ट्या पात्र दिसतो. दुसरा पर्याय रजत पाटीदार आहे. कसोटी पदार्पणात तो चमकला नसला, तरी प्रथम श्रेणीमध्ये त्याची सरासरी ४५हून अधिक आहे.