Join us

एकटा सर्फराज खानच नव्हे; गौतम गंभीरच्या साथीदारानेही लीक केलं ड्रेसिंग रूममधील संभाषण?

Gautam Gambhir Team India Dressing Room talks leaked : एका अहवालात कोचिंग स्टाफमधील सदस्यावर करण्यात आलेत गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:15 IST

Open in App

Gautam Gambhir Team India Dressing Room talks leaked : भारतीय क्रिकेट सध्या विविध कारणांनी गाजत असताना काही खेळाडू नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीरशिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाच्या दारुण पराभवानंतर या पराभवापेक्षा संघांतर्गत सुरू असलेल्या गोंधळाचीच चर्चा अधिक आहे. या सगळ्या दरम्यान युवा फलंदाज सर्फराज खानवरही संघातील माहिती मीडियाला लीक केल्याचा आरोप आहे. पण आता असा दावा केला जात आहे की केवळ सर्फराजच नाही तर कोच गंभीरच्या सपोर्ट स्टाफच्या एका सदस्यावरही बातम्या लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ड्रेसिंग रूमच्या बातम्या लीक झाल्यामुळे गदारोळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी सामन्यापूर्वी एका वृत्तपत्राने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ आणि तणावाबाबत वृत्त दिले होते. मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्व खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली होती, असे या वृत्तात सांगण्यात आले. संघातील अनेक खेळाडू कर्णधारपदासाठी दावेदारी करत असून प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातही मतभेद निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय मुख्य निवडकर्ता आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यातही सारं आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या.

यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर बीसीसीआयने आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त प्रशिक्षक, कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरही उपस्थित होते. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की या बैठकीदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये लीकचा मुद्दा समोर आला होता आणि यादरम्यान प्रशिक्षक गंभीरने युवा फलंदाज सरफराज खानचे नाव घेत त्याच्यावर बातम्या लीक केल्याचा आरोप केला. मात्र आता आणखी एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, त्यात केवळ खेळाडूच नाही तर कोचिंग स्टाफच्या एका सदस्याचेही नाव आहे आणि त्याच्यावर ही बातमी लीक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कोचिंग स्टाफ सदस्यावरही आरोप

सपोर्ट स्टाफ मधील कुठल्याही सदस्याचे नाव अहवालात नमूद केलेले नाही. गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर, मोर्ने मॉर्केल, रायन टेन डेस्चेट आणि टी दिलीप यांचा समावेश आहे, त्यापैकी दिलीप वगळता तिघांना गंभीरच्या शिफारसीनुसार संघात समाविष्ट करण्यात आले आहे. अशा स्थितीत या चौघांपैकी कोणा एकावर हे आरोप लावण्यात आले आहेत. आता हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये आणखी एका प्रशिक्षकाचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षक सितांशु कोटक असून ते फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहेत. त्यामुळे संघाचे व्यवस्थापन या गोंधळातून कशी वाट काढणार, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

 

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ