Join us

Team India future Captain: पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल सर्वात बेस्ट कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव

केवळ ७ कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजाला जबाबदारी देण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:50 IST

Open in App

Team India future Captain: भारतीय क्रिकेटमधला एक काळ असा होता की कर्णधार दीर्घकाळ आपल्या पदावर असायचा. सौरव गांगुली असो, एमएस धोनी असो वा विराट कोहली, या सर्वांनी दीर्घकाळ भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. पण गेल्या वर्षभरापासून भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा एक वेगळीच संगीतखुर्ची पाहायला मिळत आहे. केएल राहुल, रिषभ पंत, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा या सर्वांनी कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. तशातच भारताच्या एका माजी क्रिकेटरने मात्र भारताच्या कसोटी कर्णधारासाठी एक वेगळेच नाव सुचवले आहे.

रोहित शर्मा ३५ वर्षांचा आहे. तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने आपले उत्कृष्ट नेतृत्वकौशल्या दाखवून दिले आहे. सध्या तरी हार्दिककडे रोहितचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पण या दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने केवळ ७ कसोटी सामने खेळलेला श्रेयस अय्यर परिपूर्ण कर्णधार ठरू शकतो असे म्हटले आहे.

श्रेयस अय्यर याच्यासाठी हे वर्ष चांगले गेले. 2022 मध्ये त्याने 1,609 धावा केल्या. तो यंदाच्या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळेच जाडेजाला वाटते की श्रेयस अय्यर या नावाचा बीसीसीआयने पुढील भारतीय कर्णधार म्हणून विचार करायला हवा. "श्रेयस अय्यरने भारताला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. दुखापतीतून परतल्यानंतर तो शॉर्ट पिच बॉल्सवर काही काळ झगडत होता. पण आता त्याने आपल्यातील त्रुटींवर मात केल्याचे दिसत आहे. जेव्हा तुमच्याकडे समस्या सोडवण्याची कला असते किंवा तुम्ही स्वत:च्या चुका दुरूस्त करून पुढे जात राहता त्यावेळी, तुम्ही खूप यशस्वी होता. त्यामुळे श्रेयस अय्यर हा पुढील भारतीय कर्णधार बनण्यास योग्य आहे", असे जाडेजा म्हणाला.

"२-३ वर्षांपूर्वी श्रेयस अय्यरचा भारताचा पुढचा कर्णधार म्हणून विचार केला जात होता. आता परिस्थिती बदलली आहे. भारताकडे १२ कर्णधार आहेत. पण श्रेयस अय्यर सतत धावा करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ६०-७० अशी आहे. सध्या अय्यरने ज्या पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली आहे, ते पाहता तो कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे," असेही जाडेजाने स्पष्ट केले.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशश्रेयस अय्यररोहित शर्माभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्या
Open in App