No Harmanpreet Kaur In ICC Team Of The Tournament Of Womens World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं परंपरेनुसार, या स्पर्धातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची एक टीम जाहीर केली आहे. ICC च्या संघात पहिली वहिली ICC ट्रॉफी जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला संघातील फक्त तीन खेळाडूंना स्थान मिळाले असून संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचं नाव या संघात दिसत नाही. आयसीसीनं लॉरावर मर्जी बहाल करत हरमनप्रीत कौरवर अन्याय केलाय का? असा प्रश्न  आयसीसीने जाहिर केलेला संघ पाहून पडतो.
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
लॉरा कॅप्टन, हरमनप्रीत कौरशिवाय भारतीय ताफ्यातील तिघींची लागली वर्णी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिला वर्ल्ड कप स्पर्धेनंतर १२ सदस्यीय सर्वोत्तम संघ निवडला आहे. सेमी फायनलसह फायनलमध्ये शतकी खेळी करून जगात भारी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिची या संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले आहे. आयसीसीच्या संघात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनासह सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले वहिले शतक झळकवणारी जेमिमा रॉड्रिग्ज आणि यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्मासह तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. 
आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल
लॉरा कॅप्टन झाली ते ठिक, पण हरमनप्रीत संघात नसणं ही गोष्ट खटकणारीच
फायनलमधील शतकी खेळीसह दक्षिण आफ्रिकेची कर्णधार  लॉरा वोल्वार्ड हिने विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. यंदाच्या हंगामात लॉरानं ५७१ धावा केल्या. आयसीसीच्या वर्ल्ड कप  स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. विश्वविक्रमी कामगिरी करून स्पर्धा गाजवणाऱ्या लॉराला ICC च्या संघात स्थान देऊन तिच्या संघाचे नेतृत्व सोपवणं ही गोष्ट ठीक आहे. पण भारतीय संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या हरमनप्रीत कौरला संघात स्थान न मिळणं ही गोष्ट कुठंतरी खटकणारी आहे.  हरमनप्रीत कौरनं ९ सामन्यातील ८ डावात २ अर्धशतकाच्या मदतीने २६० धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये केलेली ८९ धावांची खेळी तिची सर्वोत्तम खेळी ठरली. सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत ती ११ व्या स्थानावर राहिली.   
ICC महिला वनडे वर्ल्ड कप 2025  स्पर्धेतील सर्वोत्तम संघ (Team of the Tournament) 
१. स्मृती मंधाना (भारत)
भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मंधाना हिने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत लॉरा पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत १ शतक आणि २ अर्धशतकासह स्मृतीनं ४३४ धावा करत भारताकडून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला होता. 
२. लॉरा वोल्वार्ड्ट (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने ५७१ धावा करताना दोन शतके आणि ३ अर्धशतके झळकावली होती. फायनलमध्ये शतकी खेळीसह तिने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते. पण तिची शतकी खेळी शेवटी व्यर्थ ठरली.
३. जेमिमा रॉड्रिग्स (भारत)
जेमिमा रॉड्रिग्सने यंदाच्या हंगामात एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने २९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये नाबाद १२२७ धावांची खेळी ही अवस्मरणीय अशीच होती. याशिवाय तिने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ७६ धावांची खेळी केली होती. 
४. मारीझान कॅप (दक्षिण आफ्रिका)
या अनुभवी ऑलराउंडरने २०८ धावा (दोन फिफ्टी) आणि १२ बळी घेतले. हा तिचा पाचवा वनडे वर्ल्ड कप होता. फायनलमध्ये भारताविरुद्ध ४२ धावा केल्या.
५. अॅश्ली गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
गार्डनर हिने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. एकूण ३२८ धावा आणि गोलंदाजीमध्ये ७ बळी घेतले.
६. दीप्ती शर्मा (भारत)
भारताची स्टार ऑलराउंडर दीप्ती शर्मा हिने ३ अर्धशतकासह यंदाच्या हंगामात २२ विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार पटकवला. संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात तिचे योगदान खूपच मोलाचे ठरले. 
७. अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियन सदरलँड हिने एका अर्धशतकासह ११७ धावांसह गोलंदाजीत १७ विकेट्स घेतल्या. यंदाच्या हंगामात दीप्ती पाठोपाठ सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिचा नंबर लागतो.
८. नाडीन डी क्लार्क (दक्षिण आफ्रिका)
डी क्लार्क हिने एका अर्धशतकासह २०८ धावा आणि ९  विकेट्स घेत बॅटिंग बॉलिंगमध्ये धमक दाखवली.
९. सिद्रा नवाज (पाकिस्तान)
विकेटकीपरच्या रुपात आयसीसीच्या संघात पाकच्या सिद्रा नवाजची वर्णी लागली आहे. तिने विकेट मागून ८ जणींना (४ कॅच, ४ स्टंपिंग)  पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला  केले.  फलंदाजीत तिने फक्त ६२ धावा केल्या.
१०. अॅलाना किंग (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाची लेगस्पिनर किंग हिने साउथ आफ्रिकेविरुद्ध १८ धावा खर्च करताना  ७ विकेट्स घेत खास विक्रम नोंदवला होता. महिला वर्ल्ड कप  स्पर्धेत कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
११. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
एक्लेस्टोन हिने एकूण १६ बळी घेतले. उपांत्य सामन्यात साउथ आफ्रिकेविरुद्ध तिने ४४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
१२. नॅट सिव्हर-ब्रंट (इंग्लंड)
सिव्हर-ब्रंट हिने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या जोरावर २६२ धावा केल्या. तिची ही कामगिरी ती एक सर्वोत्तम ऑलराउंडर असल्याचे सिद्ध करणारी आहे.