Nitish Kumar Reddy Century, Father gets emotional viral video, Ind vs Aus 4th Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने तळाच्या फलंदाजीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले. स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने २२१ धावांवर सात बळी गमावले होते. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने १२७ धावांची भागीदारी करत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली. नितीश रेड्डीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहत शतक ठोकले. नितीश रेड्डीच्या शतकानंतर त्याच्या वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना 'प्लॅनिंग' करून बाद केले. वरच्या फळीतील फलंदाजांपैकी यशस्वी जैस्वाल (८२) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तळाच्या फलंदाजांपैकी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी झुंज दिली. वॉशिंग्टन सुंदर ५० धावा काढून बाद झाला. पण नितीश कुमार रेड्डीने मात्र कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याने शतक झळकावताच प्रेक्षकांमध्ये बसलेले त्याचे वडील भावूक झाल्याचे दिसले. आपल्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी त्याचे वडील मेलबर्नला पोहोचले होते. ते स्टेडियममध्येच उपस्थित होते. शतकापूर्वी, कॅमेरे सतत त्यांच्यावरच होते. नितीशने चौकार मारून शतक पूर्ण केले, तेव्हा त्यांचे वडील भावूक झाले. त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारतीय फलंदाजांनी घोर निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. केएल राहुल (२४) आणि विराट कोहली (३६) या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठ्या खेळी करण्यात अपयश आले. रिषभ पंत (२८) बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला. रविंद्र जाडेजादेखील १७ धावांत माघारी परतला. पण रेड्डी आणि सुंदर या जोडीने भारताचा डाव सावरला. वॉशिंग्टन सुंदरने ५० धावांची खेळी केली. बुमराह आणि आकाश दीप शून्यावर बाद झाले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सिराज २ धावांवर नाबाद राहिला. नितीश कुमार रेड्डीदेखील १०५ धावांवर नाबाद आहे. त्याने आतापर्यंत १० चौकार आणि १ षटकार मारला.