रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लहानपणापासूनच मुंबईकरांना क्रिकेटची प्रचंड आवड असते. अनेक शालेय क्रिकेटपटू दूर अंतरावरून मुंबईत आपल्या जड आणि मोठ्या किट बॅगसह प्रवास करतात. त्यांच्या क्रिकेट बॅगमुळे अनेकांना अडचण होते. पण, मी मुंबईकरांना सांगेन की, या लहान क्रिकेटपटूंची काळजी घ्या. त्यांना थोडी जागा करून दिली, तरी ती खूप मदत ठरते, असे भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याने 'लोकमत'शी संवाद साधताना म्हटले.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर मंगळवारपासून १४ वर्षाखालील गाइल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या तीनदिवसीय अंतिम सामन्यास सुरुवात झाली. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शार्दूलने म्हटले की, लोकल प्रवासादरम्यान क्रिकेटपटूंच्या किट बॅगमुळे इतर प्रवाशांकडून व्यक्त होणारी नाराजी वर्षानुवर्षाची गोष्ट आहे. माझ्यासारख्या अनेकांनी अशा अडचणींचा सामना केला आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांना माझी विनंती आहे की, या शालेय क्रिकेटपटूंच्या खांद्यावर जड बॅग असते; बसायला जागा नसली तरी, त्यांना उभं राहण्यासाठी थोडी सुरक्षित जागा करून दिली, तरी खूप मदत होईल.
या अंतिम सामन्याच्या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे शार्दूलने म्हटले. अंतिम सामना खेळणाऱ्या बोरिवलीच्या एसव्हीआयएस शाळेतूनच क्रिकेटचे धडे गिरवलेल्या शार्दूलने सांगितले की, बोरिवलीहून चर्चगेटपर्यंत केलेला लोकल आणि बसप्रवास या सामन्याच्या निमित्ताने आठवला.
आमच्या शाळेचा संघ खूप मजबूत होता. आम्ही अनेक अंतिम सामने खेळलो आणि काही अव्वल शाळांनाही नमवले. हे निकाल आमच्या कष्टांचे फळ होते. याचे सर्व श्रेय आमचे प्रशिक्षक दिनेश लाड सरांना जाते. त्यांनी आमच्याकडून प्रचंड मेहनत करून घेतली. सामन्यापूर्वी शाळेत ते खास सराव सत्रही घ्यायचे. या आठवणींत रमणे खूप खास ठरले.
शिष्याच्या हस्ते गुरुंचा सत्कार
शार्दूलच्या हस्ते प्रशिक्षक दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिष्याचा हस्ते झालेला गुरुंचा सन्मान चर्चेची बाब ठरली. हा माझ्यासाठी अत्यंत खास क्षण आहे. माझ्या मते, हीच मुंबई क्रिकेटची ताकद आहे. माझी शाळा ब्रेबोर्न स्टेडियमवर अंतिम सामन्यात खेळत आहेत. हे खूप विशेष आहे. कारण, शालेय स्तरावर असे अनुभव सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे एमएसएसए आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे आभार. मुंबई आणि भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे खूप महत्त्व आहे.