सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत मोहम्मद शमीनं गोलंदाजीसह स्फोटक फलंदाजीसह बंगाल संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चंदीगड विरुद्धच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये शमीनं १७ चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केली. एवढेच नाही तर ४ षटकांच्या आपल्या कोट्यात फक्त २५ धावा खर्च करून एक विकेटही घेतली. २४ पैकी १३ निर्धाव चेंडूसह त्याने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिलीये.
९ मॅच, ६४ ओव्हर्स अन् १६ विकेट्स!
या स्पर्धेआधी शमीनं रणजी ट्रॉफी स्पर्धेत कमबॅकचा सामना खेळला होता. रणजीतील एका सामन्यासह सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ८ सामन्यात आतापर्यंत शमीनं ६४ षटके टाकली आहेत. ज्यात त्याच्या खात्यात १६ विकेट्सही जमा आहेत. ही आकडेवारी पाहिल्यावर मोहम्मद शमीला टीम इंडियात एन्ट्रीसाठी अजून वेटिंगमध्ये का थांबव लागतंय असा प्रश्न निर्माण होतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी
टीम इंडियात कमबॅकसाठी तयार
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुखापतीनंतर जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानातून दूर राहिल्यावर मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यातून मोहम्मद शमीनं स्पर्धात्मक क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. रणजी सामन्यात त्याने ४२.३ षटके गोलंदाजी केली. विकेट्सही घेतल्या पण पूर्वीचा शमीची झलक त्या सामन्यात दिसली नव्हती. पण आता शमीनं गियर बदलला आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो सातत्याने १३५ kmph वेगाने चेंडू फेकत आहे. एक चेंडू तर त्याने १३९ kmph वेगानेही फेकल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट तो टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असल्याचे संकेत देणारा आहे.
फिटनेसमध्ये प्रगती दिसतीये मग शमी वेटिंगवर का?
रणजी सामन्यानंतर मोहम्मद शमीनं देशांतर्गत टी-२० स्पर्धेत हिट शोसह फिट है बॉस असे संकेत दिले आहेत. पण कसोटी संघात कमबॅक करणं शमीसाठी एक वेगळ चॅलेंज असेल. एका दिवसात ३ ते ४ स्पेलमध्ये २० षटके गोलंदाजी त्याला करावी लागू शकते. गोलंदाजीशिवाय दिवसभर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उभे राहण्याचीही 'कसोटी' असेल. बीसीसीआय या स्टार गोलंदाजासंदर्भात कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं तो शंभर टक्के फिट असल्याचे स्पष्ट केल्याशिवाय कसोटीसाठी त्याची टीम इंडियात वर्णी लागू शकणार नाही. फलंदाजाच्या तुलनेत गोलंदाजासाठी कमबॅकची लढाई जिंकणं अधिक आव्हानात्मक असते. याचा विचार करुनही बीसीसीआय त्याला अधिकाधिक वेळ देत असेल. ही गोष्ट टीम इंडियासह मोहम्मद शमीच्या हिताची आहे.