Join us  

शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

MI vs RCB WPL: हरमनप्रीत कौरच्या नेतत्वातील मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 1:05 PM

Open in App

MI vs RCB WPL 2024 Eliminator | नवी दिल्ली: महिला प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगले. एलिमिनेटरच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतत्वातील मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. दडपणाच्या स्थितीत नियंत्रण गमावलेल्या मुंबई इंडियन्सला ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलची अंतिम फेरी गाठली. रविवारी आरसीबी जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडेल. मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने पराभवानंतर प्रतिक्रिया देताना इतर फलंदाजांचे कान टोचले. नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मुंबईने आरसीबीला निर्धारित २० षटकांत ६ बाद १३५ धावांवर रोखले. परंतु, मुंबईला २० षटकांत ६ बाद  केवळ १३० धावा करता आल्या. सावध सुरुवात केल्यानंतरही मोक्याच्यावेळी मुंबईची फलंदाजी कोलमडली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या बळीसाठी ४४ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी करत मुंबईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, १८व्या षटकांत श्रेयांका पाटीलने हरमनप्रीतला बाद केले आणि आरसीबीने मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखली. हरमनप्रीतने ३० चेंडूंत ४ चौकारांसह ३३, तर अमेलियाने २५ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. श्रेयांकाने २ बळी घेतले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर मुंबईकरांना दडपणातून सावरता आले नाही.

तत्पुर्वी, मुंबईकडून गोलंदाजांनी कमाल केली. हिली मॅथ्यूज आणि नताली स्किव्हर-ब्रंट यांनी आरसीबीला मर्यादित धावसंख्येत रोखले. एलिसे पेरीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. दुसऱ्या षटकापासून बळी घेत मुंबईकरांनी आरसीबीचा अर्धा संघ ८४ धावांमध्ये बाद केला. मॅथ्यूज, स्कीव्हर-ब्रंट आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आरसीबीकडून पेरीने एकाकी झुंज देताना ५० चेंडूंत ८ चौकार व एका षट्कारासह ६६ धावा फटकावल्या. तिने सहाव्या बळीसाठी जॉर्जिया वेरहॅमसोबत २६ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली.

मुंबई स्पर्धेबाहेर पराभवानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, "१८ व्या षटकात मी बाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने पकड बनवली." हरमन तंबूत परतताच मुंबईचा डाव कोलमडला आणि ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या १२ चेंडूत विजयासाठी गतविजेत्या मुंबईला १६ धावांची आवश्यकता होती. 

हरमनप्रीत कौरने सांगितले की, आम्हाला १२ चेंडूत फक्त एका चौकाराची गरज होती पण आम्ही ते करू शकलो नाही. हा खेळ तुम्हाला नेहमीच काही ना काही शिकवत असतो. यामुळे मला वाटते की दडपणातून शिकत राहावे लागेल. जेव्हा मी बाद झाली तेव्हापासून आमचा संघ पिछाडीवर पडला. त्यानंतर आमच्या फलंदाजांना संयम राखता आला नाही, तोच टर्निंग पॉइंट होता. आरसीबीविरूद्ध हरमनने ३० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगहरनमप्रीत कौरस्मृती मानधनामुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर