मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला रोखत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघानं पुन्हा एकदा फायनल बाजी मारलीये. तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सनं दिलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघातील आघाडीच्या बॅटर स्वस्तात माघारी फिरल्यावर मेरिझॅन कॅप हिने संघाच्या आशा पल्लवित केल्या. पण नॅटलीनं तिची विकेट घेत ट्रॉफी आड येणारा मोठा अडथळा दूर करत सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूनं फिरवला. मेरिझॅन कॅप हिने दिल्ली कॅपिटल्सकडून २६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. तिची विकेट मॅचची टर्निंग पॉइंट ठरली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १४१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबई इंडियन्सच्या संघानं ८ धावांनी विजय नोंदवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौरनं नॅटलीच्या साथीनं सावरला डाव; दिल्लीकडून मेरिझॅन कॅप लढली, पण..
सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हरमनप्रीत कौरनं ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४४ चेंडूत केलेल्या ६६ धावा आणि नॅट सायव्हर ब्रंटनं २८ चेंडूत ३० धावा करत दिलेली साथ याच्या जोरावरच मुंबई इंडियन्सच्या संघानं निर्धारित २० षटकात धावफलकावर १४९ धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून मेरिझॅन कॅप ४० (२६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज ३० (२१) धावा वगळता अन्य कुणालाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मेरिझॅन कॅप होती तोपर्यंत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या हातात होता. नॅट सायव्हर ब्रंटनं तिची विकेट घेत संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला.
सलग तिसरी फायनल खेळतानाही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा
एका बाजूला मुंबई इंडियन्सच्या संघानं पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सला दणका देत दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत इतिहास रचलाय. दुसरीकडे मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तिसऱ्यांदा फायनल खेळताना निराशा पदरी पडली. २०२३ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडिन्य विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं आपली पहिली ट्रॉफी जिंकली. त्यानंतर दुसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सचा प्रवास एलिमिनेटरमध्ये संपला. पण त्यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रॉफी आड आला. २०२४ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पराभूत करत WPL स्पर्धा गाजवली होती. आता दिल्लीचा संघ पुन्हा एकदा १५० धावा करताना अडखळला अन् तिसऱ्या प्रयत्नातही ट्रॉफीवर नाव कोरण्यात हा संघ अपयश ठरला आहे.