गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामुळेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू व तृणमुल काँग्रेसचा आमदार मनोज तिवारी ( Manoj Tiwari) यान पेट्रोल व डिझेलच्या किमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यानं पंतप्रधानांचं २०१२सालचं ट्विट शेअर करताना ही टीका केली.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. पेट्राेलपाठाेपाठ काही राज्यांमध्ये डिझेलचेही दर शंभरी पार गेले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्राेलचे दर ३५ पैसे आणि डिझेलचे दर १८ पैशांनी वाढविले. त्यामुळे आता मध्य प्रदेशमध्ये डिझेलच्या दराने शतक गाठले आहे. याशिवाय सिक्कीममध्येही पेट्रोल शंभरी पार गेले आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्रोल ९९.५१ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल दर ८९.३६ रुपये प्रतिलिटर एवढे झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर १०५.५८ रुपये, चेन्नईत १००.५३, कोलकाता येथे ९९.४५ रुपये आणि बंगळुरू येथे १०२.८४ रुपये प्रतिलिटर एवढे झाले.
IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!
कच्च्या तेलाचा दाेन वर्षांतील उच्चांक -
४ मेपासून आतापर्यंत ३४ वेळा पेट्रोलची, तर ३३ वेळा डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. तेव्हापासून पेट्रोल ९.११ आणि डिझेल ८.६३ रुपये प्रतिलिटरने महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७५ डॉलर्स प्रतिबॅरलच्या वर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
मोदींनी २०१२मध्ये काय ट्विट केलं होतं?
पेट्रोलच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही काँग्रेस सरकारच्या अपयशाचं उदाहरण आहे. यामुळे गुजरातवर शंभर कोटींहून अधिकचा भार पडला आहे.
![]()
मनोज तिवारी काय म्हणतो?
पेट्रोलच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही बीजेपी सरकारचे अपयशाचे उदाहरण आहे. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या संकटात आधीच सामान्य जनता भरडली जात आहे आणि त्यात त्यांच्यावर हे महागाईचं संकट. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्पच आहेत.