नवी दिल्ली : सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीची गणना क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये कोहलीची ‘विराट’ कामगिरी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली आहे. मात्र, असे असले तरी फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनने (एफआयसीए) तयार केलेल्या टी२० क्रिकेटमधील अव्वल १० क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये कोहलीचा समावेश करण्यात आलेला नाही. या यादीसाठी गेल्या १८ महिन्यांपासून अनेक आकडेवारींची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोत्तम १० टी२० क्रिकेटपटूंची यादी तयार करण्यात आली आहे.
‘एफआयसीए’ने पहिल्यांदाच टी२० खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण (पीपीआय) केले आहे. यामध्ये जगभरातील खेळाडूंची कामगिरी, संघाच्या विजयातील योगदान आणि फलंदाजीतील सरासरीचा विचार करण्यात आला आहे. या यादीमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू अशा सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार जो खेळाडू आपल्या विभागात सर्वोत्तम आहे, त्याला अव्वल १० टी२० क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. भारताचा स्टार कर्णधार विराट कोहली ६७९ गुणांसह तब्बल १३व्या स्थानी विराजमान आहे.
‘एफआयसीए’च्या सर्वोत्तम टी२० खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये सर्वांत आघाडीवर आॅस्टेÑलियाचा आक्रमक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आहे. त्याला सर्वाधिक ७८६ गुण मिळाले आहेत. यानंतर वेस्ट इंडिजचा सुनील नरेन आणि दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.
आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत विराट कोहलीने कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९०० गुणांकन मिळवले. एकाचवेळी दोन्ही क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा कोहली द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनंतर केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला. त्यामुळेच या यादीत कोहलीचे १३वे स्थान सर्वांना चकित करीत आहे. यामध्ये सुरेश रैना १८व्या, तर हार्दिक पांड्या २२व्या स्थानी आहे.
असे दिले गुण...
फलंदाजी : स्ट्राइक रेट, सरासरी, संघाच्या धावसंख्येतील योगदान, चौकार स्ट्राइक रेट.
गोलंदाजी : इकोनॉमी रेट, इंडेक्स इकोनॉमी रेट, सरासरी, निर्धाव चेंडू सरासरी.
क्षेत्ररक्षण : वाचवलेल्या धावा, झेल.