टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला धक्क्यावर धक्के बसल्याचा एक सीन पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा मुद्दा चर्चेत असताना संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
बॅकअपच्या रुपात ऋतुराज गायकवाड अन् साई सुदर्शनपेक्षा देवदत्त पडिक्कल ठरला भारी केएल राहुल आणि विराट कोहली मॅच सिम्युलेशन दरम्यान दुखापतग्रस्त झाले. सुदैवाने हे दोघे रिकव्हर झाले. पण शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. परिणामी भारतीय संघ व्यवस्थापनाला अन्य पर्याय शोधावे लागले. त्यात ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन या दोघांना मागे सोडत देवदत्त पडिक्कल याने बाजी मारली आहे. भारत 'अ' संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या देवदत्त पडिक्कल याला टीम इंडियात बॅकअप खेळाडूच्या रुपात स्थान देण्यात आले आहे. या वृत्तानंतर ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांना डावलून त्याला पहिली पसंती का देण्यात आली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी
ऋतुराज गायकवाडला का नाही मिळाली संधी?
ऋतुराज गायकवाड याच्याकडे कानाडोळा करण्यात येतोय का? असा प्रश्न देवदत्त पडिक्कल याच्या टीम इंडियातील एन्ट्रीनंतर अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण ऋतुराज गायकवाड मागे पडण्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याची संघर्षमय स्टोरी कारणीभूत असल्याचे दिसून येते. ऑस्ट्रेलियातील अनपौचारिक कसोटी सामन्यात भारत 'अ' संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे होते. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध त्याला ना कॅप्टन्सीत चमक दाखवता आली ना बॅटिंगमध्ये त्याचा जलवा दिसला. मोक्याच्या क्षणी आलेले अपयश हे तो या शर्यतीत मागे पडण्याचे एक प्रमुख कारण आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एक सलामीवीर आहे. दुसरीकडे देवदत्त पडिक्कलसाठी जी संधी चालून आलीये ती मध्य फळीतील उणीव भरून काढण्यासाठी आहे. शुबमन गिल हा मागील काही सामन्यांपासून कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. रोहितच्या अनुपस्थितीत सलामीवीर खेळाडूच्या रुपात लोकेश राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन ही नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड मागे पडल्याचे दिसते.
देवदत्त पडिक्कल अन् साई सुदर्शन यांच्यात होती शर्यत
बॅकअप खेळाडूच्या शर्यतीतून ऋतुराज गायकवाड बाद झाल्यावर देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांच्यात स्पर्धा होती. साई सुदर्शन याने ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध कठीण परिस्थितीत शतकी खेळी केली होती. याच सामन्यात देवदत्त पडिक्कल याच्या भात्यातून ८८ धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले होते. आता दोघांत तगडी स्पर्धा असताना देवदत्त पडिक्कल याने बॅटिंग पोझिशनमधील लवचिकतेच्या जोरावर साई सुदर्शनला मागे टाकले. तो चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही एक सक्षम पर्याय आहे. या परिस्थितीत विराट कोहलीला तिसऱ्या आणि ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा प्रयोग करणंही टीम इंडियाला अगदी सहज शक्य होईल.